Latest Weather Update : जानेवारी महिना जवळपास अर्धा संपला आणि संपूर्ण देशभरात थंडीनं जोर धरण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी अनपेक्षितपणे तपामानाच झालेली घट स्थानिकांच्या दैनंदिन आयुष्यावरही परिणाम करून गेली. अगदी, मुंबईकरही यातून वाचलेले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि नजीकच्या परिसरामध्येसुद्धा कोरडे वारे वाहू लागले आणि तापमानातील झोंबणारा गारवा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम करून गेला. त्यातच शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारात शहरातील तापमानात काही अंशांनी वाढ झाली. ज्यामुळं सातत्यानं बदलणाऱ्या हवामानामुळं सर्दी पडसं अशा तक्रारी असणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. 


दोन दिवसांनी तापमानात होणार मोठी उलथापालथ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील तापमान काही अंशांनी वाढलं असलं तरीही पुढच्या दोन दिवसांमध्ये त्यात पुन्हा एकदा त्याय लक्षणीय घट नोंदवली जाणार असून हा आकडा 14 अंशांच्याही खाली येऊ शकतो. गुरुवारी रात्री पश्चिमी वाऱ्यांमुळे समुद्रामधील तापमानात वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा वाढलेल्या तापमान बदलाचा सामना करावा लागला.



पश्चिमी वाऱ्यांच्या या प्रभावासोबतच उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभावही अतिशय कमी झाला आणि शुक्रवारी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली.


देशाच्या उत्तरेकडे आणखी एक शीतलहर सक्रीय 


मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या भागांसोबतच त्यानजीकच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा शीतलहर सक्रीय झाली आहे. त्यामुळं वातावरणात प्रचंड गारवा अनुभवायला मिळत आहे. शिवाय सिक्किम, मेघालय, पश्चिम बंगाल, ओडिसा, आसाम आणि त्रिपुरामध्येसुद्धा पुढील दोन दिवस तापमान शून्य अंशाच्या खाली असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


हेसुद्धा वाचा : Digital Rupee : बिहारच्या फळविक्रेत्याची मुंबईत RBI कडून पायलट प्रोजेक्टसाठी निवड


पर्वतीय भाग बर्फानं अच्छादणार 


देशात आलेल्या थंडीच्या लाटेमुळं अती उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमधील पर्वतीय भाग पूर्णपणे बर्फानं अच्छादला जाऊ शकतं. हिमाचलमधील मनाली, लाहौल, धरमशाला आणि किलाँगमध्ये पूर्णपणे बर्फाची चादर सध्या पाहायला मिळत आहे. किलाँगमध्ये तापमान उणे 7 अंशांवर पोहोचलं आहे. तर, उत्तराखंडच्या औली, केदारनाथ, बद्रीनाथ, हेमकुंड साहिब या भागांमध्येसुद्धा जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. जम्मू काश्मीरमध्येही सध्या अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हवामाना खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार इथं 20 जानेवारीनंतरच तापमान काही फरकानं वाढेल आणि स्थानिकांना दिलासा मिळेल.