मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण १४ अर्जांपैकी चार उमेदवारांनी आज आपले अर्ज मागे घेतले. तर, एक अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाला. एकूण नऊ जागांसाठी नऊच वैध अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, तसंच काँग्रेसचे राजेश राठोड यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नऊ जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात होते. तर एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. मंगळवारी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होईल, असे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून ही विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, असा दावाही करण्यात आला आहे. त्याप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. कारण चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.


विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. दरम्यान, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या १४ मे २०२० आहे. त्याआधीच चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता औपचारिकता राहिली आहे.


भाजपचेही चार उमेदवार बिनविरोध ठरले. मात्र आजच्या नाट्यमय घडामोडीत पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. अजित गोपछडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यांच्या जागी काल डमी म्हणून अर्ज दाखल करणारे रमेश कराड यांचा अर्ज भाजपतर्फे कायम ठेवला. त्यामुळे कराड यांच्यासह रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके या चार भाजपा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.


दरम्यान, एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. नामनिर्देशनपत्र अवैध ठरलेले उमेदवार शेहबाज राठोड हे असून ते अपक्ष  म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. काल अर्ज छाननीत अपक्ष उमेदवार शेहबाज राठोड यांचा अर्ज बाद झाल्या. त्यांच्या अर्जात सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या नव्हत्या. तर, भाजपचे संदीप लेले आणि अजित गोपचडे, तसंच राष्ट्रवादीचे किरण पावसकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.