मुंबई : मुंबईतील गोरेगावच्या पूर्व आरे कॉलनीमध्ये बिबट्याचे अटॅक वाढताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून बिबट्याने हल्ला केल्याची प्रकरण नोंदवण्यात आली आहेत. अशातच अजून एक प्रकरण समोर आलं आहे. एका वरिष्ठ महिलेवर बिबट्याने हा हल्ला केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिबट्याने या महिलेवर केलेला हल्ला CCTVमध्ये कैद झाला आहे. बुधवारी संध्याकाळी जवळपास 7.45 वाजताची ही घटना आहे. दरम्यान हल्ला केलेल्या महिलेने बिबट्याला काठीने मारून पळवून लावलं.


हा बिबट्या गुपचूप घराच्या मागे बसला होता. यानंतर ही महिला त्या ठिकाणी येऊन बसली. महिला बसली असल्याचं पाहताच हळू-हळू बिबट्या तिच्या जवळ आला आणि तिची मानेला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी महिलेने देखील त्याच्यावर जोरात काठीने वार केला आणि त्याला पळवून लावलं.


या हल्ल्यानंतर महिलेला रूग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान तिची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये एका 4 वर्षांच्या मुलावरही बिबट्याने अटॅक केला होता. त्यावेळी या मुलाच्या वडिलांनी बिबट्याला पळवून लावलं होतं. मात्र अजूनही बिबट्यांचे हल्ले सुरुच आहेत.



तर दुसरीकडे आरे वसाहतीमधील मेट्रो-३ चे कारशेड रद्द करण्यात आले आहे. या कारशेडला लागून असलेल्या वसाहत क्रमांक 22 येथील तपेश्वर मंदिराजवळ आरेमधील स्थानिक मुलांना बिबट्याचे पिल्लू आढळून आलं. दगडाच्या मागे बसलेलं पिल्लू ओरडत असल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या मुलांना त्याचा आवाज आला. 


मुलांनी त्य़ाठिकाणी जाऊन पाहणी केल्यावर ते पावसामुळे भिजलं होतं आणि त्यावेळी पाऊस देखील पडत होता. म्हणून या मुलांनी पिल्लाला ताब्यात घेऊन पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी वन विभागाला कळवल्यानंतर घटनास्थळी ठाणे वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. पावसाच्या अंदाज घेऊन आज रात्री या पिल्लाची त्याच्या आईबरोबर भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल. हे पिल्लू साधारण 3 ते 4 महिन्यांचं असल्याचं सांगण्यात येतंय.