मुंबई : पत्रकार ज्योतीर्मय डे म्हणजेच जे डे हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष मकोका न्यायालयाने आज सकाळी छोटा राजनला जे डे हत्या प्रकरणात दोषी असल्याचं सांगितलं होतं. छोटा राजनसह ९ जण या हत्या प्रकरणात दोषी आहेत. तर पत्रकार जिग्ना व्होरा हिला निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. शूटर सतिश काल्या आणि विनोद चेंबूर यांनी जे डे यांच्यावर गोळ्य़ा झाडल्या होत्या, यांच्यासह अभिजित शिंदे, अरूण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे हे देखील दोषी असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. जे डे यांची ११ जून २०११ रोजी हत्या करण्यात आली होती, जे डे हे इंग्रजी दैनिकांसाठी पत्रकारिता करत होते. जे डे यांचा अंडरवर्ल्डविषयी मोठा अभ्यास होता. जे डे यांच्या हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज देखील आलं होतं.


काय घडलं जे. डे. च्या हत्येदिवशी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे डे हे अंडरवर्ल्डमधल्या घडामोडींचं वार्तांकन करायचे. ११ जून २०११ च्या दिवशी घाटकोपरमध्ये आईची भेट घेऊन जे डे पवईच्या आपल्या फ्लॅटवर जात असताना पवई हिरानंदानी परिसरात बाईकवरून आलेल्या मारेकऱ्यांनी जे डे यांच्यावर गोळीबार केला. ५ गोळ्या जे डे यांच्यावर झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरूवातीला तपास मुंबई पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रँचतर्फे केला जात होता. मात्र छोटा राजनला अटक करून भारतात आणल्यावर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. या प्रकरणात एकूण १२ आरोपी आहेत. यातल्या विनोद असरानी उर्फ विनोद चेम्बूरचा मृत्यू झालाय. त्यामुळे ११ आरोपींविरोधात हा खटला सुरू आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार जे डे यांच्या वार्तांकनामुळे छोटा राजन नाराज होता. त्यामुळे राजनच्या सांगण्यावरून सतीश कालिया या गुंडाने जे डे यांच्यावर गोळ्या झाडल्या. यासाठी सतीश कालियाला पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यातील २ लाख रूपये अॅडव्हान्स तर ३ लाख रूपये हत्येनंतर देण्यात येणार होते. या प्रकरणात एशियन एज या वृत्तपत्राच्या मुंबई डेप्युटी ब्युरो चीफ आणि महिला पत्रकार जिग्ना व्होरा यांना अटक झाल्यामुळे खळबळ माजली होती. हत्याकांडा आधी व्होरा आणि राजन यांच्या तब्बल ३० हून अधिक वेळा फोनवरून संभाषण झालं. घटनेच्या आधी ३ ते ४ महिन्यांपासून मारेकरी जे डे यांच्यावर लक्ष ठेऊन होते.


कशी घडली जे डे यांची हत्या? 


हत्येच्या दिवशी सतीश कालिया आणि अरूण डाके यांनी बाईकवरून येऊन जे डेंवर गोळीबार केला. सतीश कालियाने गोळ्या झाडल्या तर अरूण डाके बाईक चालवत होता. दुसऱ्या बाईकवर मंगेश आगवणे आणि अनिल वाघमारे हे दोघे होते. तिसऱ्या बाईकवर अभिजीत शिंदे आणि निलेश शेडगे होते. सचिन गायकवाड आणि इतर आरोपी जीपमध्ये बसून जे डे यांचा पाठलाग करत होते. नैनितालला राहणाऱ्या दीपक सिसोदियाने या हत्याकांडासाठी सतीश कालियाला काडतुसं आणि पिस्तुल दिलं होतं. तर पॉल्सन जोसेफ नावाच्या आरोपीने सतीश कालियाला ग्लोबल रोमिंग कार्ड्स आणि सुपारीचं अॅडव्हान्स पेमेंट म्हणून 2 लाख रूपये दिले होते. या रोमिंग कार्डावरून जिग्ना व्होरा आणि छोटा राजन यांच्यात फोन संभाषण झालं होतं.


साक्षीदारांनी फिरवली साक्ष


या प्रकरणातल्या दोन साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली. त्यात एका पत्रकाराचाही समावेश आहे. तर पोलिसांना अजूनही दोन आरोपी अटक करता आलेले नाहीत. त्यापैकी रवी रितेश्वर या आरोपीला परदेशात अटक झालीय. मात्र त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आलेलं नाही तर नयनसिंह बिष्त हा आरोपी अजूनही फरार आहे.