मुंबई : ‘विकास…विकास’ म्हणून खूप ऊर बडवला, पण तो तर कुठेच दिसत नाही. म्हणून लोडशेडिंगचा अंधार केला जात आहे काय, असा सवाल लोक राज्यकर्त्यांना विचारत आहेत. महाराष्ट्राला अंधारात ढकलणाऱयांनो, कोळसा उगाळणे थांबवा आणि आता तरी ‘दिवे’लावा!, अशा तीव्र शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. जनतेच्या प्रश्नासाठी सत्तेत राहूनच सरकारला विरोध करेन, असे नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले. त्यानंतर शिवसेनेने भाजप सरकारचा विरोध काहीसा तीव्र केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामना या वृत्तपत्रातही याचे प्रतिबींब पहायला मिळत आहे. ''दिवे' लावा' या मथळ्याखाली ठाकरे यांनी सामनात शनिवारी (७ ऑक्टोबर) लिहीलेल्या लेखातही सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.


काय म्हटले आहे सामनात?


- पूर्वाश्रमीची सगळीच सरकारे आणि राज्यकर्ते तद्दन नालायक होते. राज्य कारभार कशाशी खातात हेच त्यांना ठाऊक नव्हते. आता आम्हीच काय तो या महाराष्ट्राचा आणि देशाचा उद्धार करू, अशा गमजा मारणाऱया मंडळींचे बुरखे दररोजच टराटरा फाटत आहेत. विकासापासून ते ‘अच्छे दिन’पर्यंत, ‘मेक इन इंडिया’पासून ते महागाईपर्यंत आणि शेतकऱयांच्या आत्महत्यांपासून महाराष्ट्राला अंधारात लोटणाऱया लोडशेडिंगपर्यंत प्रत्येक आघाडीवर राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेचे वस्त्रहरण होत आहे. 


- अच्छे दिन’च्या स्वप्नाळू दुनियेतून हळूहळू बाहेर पडू लागलेली जनताच आता अंधकारमय बनलेल्या ‘पारदर्शक’ कारभाराची सोशल मीडियावर यथेच्छ टिंगलटवाळी करताना दिसते आहे. जेमतेम अडीच-तीन वर्षांच्या कारभारातच सरकारवर ही नामुष्की ओढवावी हे नाही म्हटले तरी जनतेचेच दुर्दैव म्हणायला हवे.


- केवळ सरकारच्या गलथान कारभारामुळे अवघा महाराष्ट्र आज लोडशेडिंगमुळे काळोखात बुडाला आहे. दिवाळी जवळ आली आहे. प्रकाशाचा, दिव्यांचा उत्सव तोंडावर आला असतानाच राज्यकर्त्यांच्या नादान कारभारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात काळोख पसरला आहे. कुठे तीन तास, कुठे सहा तास, कुठे नऊ तास तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चौदा तास वीज गायब आहे.


- सरकारच्या कृपेने ओढवलेल्या लोडशेडिंगच्या संकटाने संपूर्ण महाराष्ट्रालाच आपल्या कवेत घेतले आहे. ग्रामीण महाराष्ट्र तर महिनाभरापासून अंधारातच चाचपडतो आहे. 


- 'कोळशाचा पुरवठाच पुरेसा होत नाही हो।’ असा गळा राज्याचे ऊर्जामंत्री गेले कित्येक दिवस काढत आहेत. कोळशाचा पुरवठा कोणी करायचा, त्याची साठवणूक कोणी करायची, किती करायची हा सर्वस्वी सरकारचा विषय आहे. 


- वीजनिर्मितीसाठी कोळसा आवश्यक आहे हे जर तुम्हाला ठाऊक आहे तर कोळशाचा पुरेसा साठा करून का नाही ठेवला? टंचाई-टंचाई म्हणून तोच तो कोळसा किती दिवस उगाळत बसणार? पुन्हा कितीही उगाळला तरी शेवटी कोळसा तो कोळसाच! त्यामुळे तेच ते रडगाणे जनतेला ऐकवण्यापेक्षा एवढय़ा दिवसांत कोळशाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न का नाही केलेत?


- केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तुम्हीच सत्तेवर आहात. मग अडचण कसली? कोळशाचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात तुम्ही चुकला असाल, कमी पडला असाल तर तसे जाहीर करून लोडशेडिंगचे चटके सहन करणाऱया महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा.


- मोठमोठय़ा जाहिराती आणि लंबीचवडी भाषणे यावर देश फार काळ चालत नाही. लोक नंतर हीच भाषणे तोंडावर फेकून मारतात. त्याचे प्रत्यंतर राज्यकर्त्यांना आता येऊ लागले आहे.


- महाराष्ट्राला अंधकार देणा-यांना दूर करू आणि महाराष्ट्रात प्रकाश आणू शकतील अशांना महाराष्ट्राची सूत्रं देऊ हेच आपल्याला ठरवायचंय’ असा दिव्य संदेश मुख्यमंत्री या व्हिडीओतून देताना दिसतात. महाराष्ट्राने सूत्रे सोपवली खरी, पण आता तर आधीपेक्षा अधिक काळोख दाटून आलाय. त्यामुळे  ‘मुख्यमंत्र्यांनी आपलाच हा व्हिडीओ पुन्हा बघायला हवा’ अशा मल्लिनाथीसह स्वप्नाळू प्रचाराची धुलाई सोशल मीडियावर सुरू आहे.


-'विकास…विकास’ म्हणून खूप ऊर बडवला, पण तो तर कुठेच दिसत नाही. म्हणून लोडशेडिंगचा अंधार केला जात आहे काय, असा सवाल लोक राज्यकर्त्यांना विचारत आहेत. महाराष्ट्राला अंधारात ढकलणाऱयांनो, कोळसा उगाळणे थांबवा आणि आता तरी ‘दिवे’ लावा!