प्रत्यक्ष कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या फक्त ३७ लाख
राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणा-या शेतक-यांची संख्या ५० लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणा-या शेतक-यांची संख्या ५० लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे. राज्यातील 89 लाख शेतक-यांना 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल अशी घोषणा सरकारने ही योजना जाहीर करताना केली होती. या योजनेंतर्गत राज्य सरकराने 31 मार्चपर्यंत 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम बँकांकडे जमा केली आहे. यातील प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतक-यांची संख्या 37 लाख असून, त्यांच्या खात्यात आतापर्यंत 14 हजार 700 कोटी रुपये जमा झाले आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ
सरकारने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 31 मार्चपर्यंत देण्यात आलेली ही मुदत आता 14 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलीय. तर वन टाइम सेटलमेंटची मुदतही सरकारने 30 जूनपर्यंत वाढवलीय. मात्र ही मुदत वाढवूनही जास्त शेतकऱ्यांचे अर्ज येण्याची शक्यता कमी असल्याचे सहकार खात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता.