मुंबई : नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला. त्यानंतर आता काँग्रेस आणि शिवसेनेने केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. ही दुटप्पी भूमिका असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार आणि मुंबईच्या महापौर यांनी भाजपवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्थापनेच्या मुहूर्तावर महिलांसाठी लोकल सेवा सुरू होणार होती. मात्र, रेल्वेने राज्यसरकारचा प्रस्ताव फेटाळला. नंतर विचार करु असे सांगत हात झटकले आणि सर्व महिलांसाठीची लोकल सेवा सुरु करण्यात खोडा घातला. दरम्यान, राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात समन्वय नसल्याने महिलांच्या आनंदावर विरजण पडले आहे. रेल्वे सेवा सुरू होणार असल्याने शनिवारी सकाळीच अनेक महिलांनी विरार रेल्वे स्थानक गाठले. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी उसळली. मात्र पोलिसांनी त्यांची अडवणूक केल्यानं महिला संतप्त झाल्यात.


महिलांच्या सन्माला ठेच - वडेट्टीवार


दुर्गा उत्सवात महिलांसाठी आम्ही लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र रेल्वे बोर्ड मंजुरी देत नाही. म्हणजे महिलांच्या सन्मानाची यांना काळजी नाही. भाजपची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे रामलीलाच्या नावाने राजकारण करायचे आणि दुसरीकडे महिलांच्या सन्माला ठेच पोहोचवायची आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. महिलांच्या सन्मान म्हणून महिलांच्या प्रवासाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी द्यावी, यात राजकारण करू नये, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.


राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिली असली तरी आजच महिलांसाठी लोकल सेवा सुरू करणं शक्य नसल्याचं पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले. सरकारच्या घोषणेवर रेल्वे प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे आणि सेवा सुरु करण्याआधी तयारीची आवश्यकता असल्याचे रेल्वे प्रशासनानं म्हटले आहे. दरम्यान महिलांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्याबाबत पुढील तीन-चार दिवसांत निर्णय घेणार असल्याचं, रेल्वे प्रशासनानं सांगितले.


केंद्राकडून याची दखल - महापौर


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी बीकेसी येथील कोव्हिड सेंटरला भेट दिली. या सेंटरमधून आतापर्यंत १० हजार कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे या सेंटरमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. एवढं चांगलं काम करूनही केंद्रानं याची दखल घेतली नाही, अशी टीका महापौर पेडणेकर यांनी यावेळी केली. महिलांना लोकल प्रवासासाठी रेल्वेकडून संमती देण्यात आलेली नाही, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.