विरार : कोरोना लॉकडाऊन (Corona lockdown) काळात देशातील असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. परिणामी घराचं, व्यवसायाच्या ठिकाणाचं भाडं देणंही लोकांना कठीण झालं आहे. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेकजण टोकाचं पाऊल उचलत आहे. अशीच एक दुर्देवी घटना विरारमध्ये घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरारमध्ये असलेल्या स्टार प्लॅनेट हॉटेलच्या चालकाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करूणाकर बी पुत्रण असं हॉटेल चालकाचं नाव आहे. कोरोनामुळे आलेलं आर्थिक संकट आणि भाड्यासाठी सततच्या तगाद्यामुळे करुणाकर गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होते. 


करुणाकर यांच्या अंगावर दोन वर्षांपासून थकीत भाडं होतं, तसंच लाईट बिलाचे अंदाजे 40 लाख रुपयांचं कर्ज होतं. या तणावाला कंटाळून त्यांनी अखेर टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी 9 वाजता हॉटेल मध्ये कोणी नसताना करुणाकर यांनी हॉटेलमध्ये गळफास घेतला. याबाबतची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवून दिला.


आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. या घटनेने वसई विरारच्या हॉटेल व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून त्यांच्या मृत्यूस जवाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी हॉटेल चालकाच्या पत्नीने केली आहे.