मुंबई : राज्यात घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm udhav thackre) यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. डेल्टा प्लस (delta plus) विषाणूचा देखील धोका आहे हे सगळे लक्षात ठेवून पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्स लागतील तसंच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज मुख्यमंत्र्यांनी व्हिसीद्वारे संवाद साधला. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते.


'घाईघाईने व्यवहार खुले करू नका'
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा धोका अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या  ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका अशा सूचना मुख्यमत्र्यांनी दिल्या आहेत. 


दुसऱ्या लाटेत राज्याने ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे, आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आतापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी आणि इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज
राज्यातील  7 जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील 3 जिल्हे कोकण, 3 पश्चिम महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील जिल्हा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचणी, तसेच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल तसंच या जिल्ह्याना यासंदर्भात आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात येतील असं मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितलं. टास्क फोर्सचे डॉ संजय ओक आणि डॉ शशांक जोशी यांनी सांगितले कि, या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना आणि समजुती काढून घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे खूप आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत