उदयनराजे भोसले नाराज, आता माझी भागली!
लोकांना वाटत असेन तरच मी उभा राहीन, अन्यथा बस्स झालं.- उदयनराजे भोसले
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर त्यांनी साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवारीपासून नाराजीपर्यंत अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. नेमकं उदयनराजे भोसले काय म्हटले ते पाहूयात.
माझ्या पेक्षा जास्त मते पडलेली दाखवावीत. मी त्याचा प्रचार करेन. त्याच्यासाठी काम करेन. आता माझी भागली, लोकसभा लढवण्याची गरज नाही. मी पवारांचा लाडका म्हणूनच जास्त भीती वाटते. माझे अनेक पक्षात मित्र आहेत, अशी नाराजी लोकसभा निवडणूक तिकीटाबाबत खासदार उदयनराजे यांनी थेट बोलण्यातून व्यक्त केलेय.
आता माझी भागलेय. खासदारकी लढवली पाहिजेय, असं काही नाही. अशा भूमिकेत मी नाही. लोकांना वाटत असेन तरच मी उभा राहीन, अन्यथा बस्स झालं. अनेक वर्ष आमदार होतो. मंत्री होतो. आता खासदार. एवढी वर्ष काम करत होतो. प्रत्येकाला वाटत व्यक्ती म्हणून जगावं. तसं मलाही वाटतं. मी काही निवृत्ती घेत नाही. लोकांच्या आग्रहापोटी आपण काहीही करु शकत नाही, असे सांगत राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे स्पष्ट संकेत उद्यनराजे भोसले यांनी दिलेत.