मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चे जोरदार वारे सध्या वाहत आहेत. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघाचा तिढा अखेर सुटला आहे. या ठिकाणाहून स्थायी खासदार किरिट सोमय्या यांचा पत्ता कट केला असून त्याजागी मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाचा मित्र पक्ष शिवसेनेचा सोमय्यांच्या नावाला जोरदार विरोध होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज कोटक हे २००७ पासून महापालिकेत नगरसेवक आहेत. २००७, २०१२ व २०१७ तीन वेळा मुलुंडमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. पालिका भाजप गटनेता म्हणून साडेचार वर्ष काम करत आहेत. तसेच त्यांनी शिक्षण समिती अध्यक्षपदही सांभाळले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेना भाजपाच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या संसदीय समितीनं निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. किरीट सोमय्यांना भाजपाकडून उमेदवारीसाठीचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा आहे. शिवसेनेनं तीव्र विरोध केल्यामुळे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. 



भाजपाने ऐनवेळी किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिलीच तर शिवसेनेने सुनिल राऊत यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी ठेवली होती. सुनिल राऊत हे सध्या भांडुप विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पण आता कोटक यांच्या उमेदवारीची चर्चा झाल्याने राऊत यांच्या नावाची चर्चा शांत झाली आहे. उमेदवारीचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाण्याचीही तयारी केली होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमय्यांना भेट नाकारल्याचेही वृत्त आहे. अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज भरताना तेथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळीही किरिट सोमय्यांच्या अर्जाबाबत चर्चा होणार असल्याचे युतीच्या गोटातून सांगण्यात येत होते.