Bhiwandi Loksabha : कपिल पाटलांची प्रतिष्ठा पणाला, बाळ्या मामा रोखणार का हॅटट्रिक?
Maharashtra Politics : भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रेंचं आव्हान त्यांच्यापुढं आहे. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं? पाहूयात हा खास रिपोर्ट
Bhiwandi Loksabha Election 2024 : भिवंडी... छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी... जुन्या काळापासून कल्याण भिवंडी ही बंदरं अस्तित्वात आहेत. यंत्रमाग उद्योग आता डबघाईला आलाय. मात्र, आशियातील सर्वात मोठं लॉजेस्टिक पार्क म्हणून भिवंडी उदयाला आलंय. मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी मोठमोठी धरणं... कल्याण हे रेल्वेचं पहिलं मोठं जंक्शन याच मतदारसंघात येतं. समृद्धी महामार्गाची सुरूवातही भिवंडीजवळच्या वडपे भागातून होते. मात्र एवढं महत्त्वाचं शहर असूनही, विकासाच्या आघाडीवर ते मागेच राहिलं.
भिवंडीच्या समस्या
पाणी, वीज, मोठे रस्ते यासारख्या मुलभूत सोयीसुविधांचा अजूनही अभाव आहे. शहापूर, मुरबाडच्या ग्रामीण भागात धरणं असूनही पाण्याचा प्रश्न जटील बनलाय. महामार्ग विस्तारीकरणामुळं प्रचंड वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतोय. अपुऱ्या लोकल सेवेचा फटका स्थानिक नागरिकांना बसतोय
मतदारसंघातील आदिवासींच्या समस्या सुटलेल्या नाहीत.
भिवंडीचं राजकीय गणित
2009 साली पुनर्रचनेनंतर भिवंडी हा नवा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. सध्या या मतदारसंघात भाजपचं कमळ फुललंय. 2009 मध्ये काँग्रेसचे सुरेश टावरे यांनी भाजपच्या जगन्नाथ पाटलांचा 41 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये भाजपनं कपिल पाटील यांना मैदानात उतरवलं. त्यांनी काँग्रेसच्या विश्वनाथ पाटलांना हरवलं. 2019 मध्ये कपिल पाटील दुसऱ्यांदा खासदार झाले. त्यांनी काँग्रेसच्या सुरेश टावरेंना पराभूत केलं. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि सपाचा 1 आमदार आहे.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवल्याची बक्षिसी म्हणून भाजपनं कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. यंदा विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलीय. दुसरीकडं राष्ट्रवादी शरद पवार गटानं काँग्रेसकडून ही जागा खेचून घेतली. बाळ्यामामा म्हात्रे यांना मैदानात उतरवलं. त्यामुळं काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान म्हात्रेंपुढं असणार आहे.
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार अशी थेट लढत इथं असली तरी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. वंचितनं त्यांना पाठिंबा दिल्यानं इथं आता तिरंगी लढत रंगणार आहे. भिवंडीत कपिल पाटलांच्या विरोधात भाजपमध्येच नाराजी आहे. तर बाळ्या मामा म्हात्रेंना काँग्रेसच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. मतदारसंघातली आगरी आणि कुणबी मतं नेमकी कुणाच्या पारड्यात पडतात, यावर विजयाचं गणित अवलंबून असणार आहे.