देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या युतीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र मनसे लोकसभा निवडणुका लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मनसेला 1 ते 2 जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढवण्याची मागणी भाजप आणि शिवसेनेने केली आहे. मात्र हा प्रस्ताव मनसेने फेटाळला. मात्र भाजप पुन्हा मनसेला प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी लोकसभा निवडणुकासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणूक लढायची की नाही, हा निर्णय मी येत्या तीन ते चार दिवसात स्पष्ट करेन, पण तोपर्यंत तुम्ही काम करत राहा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिले आहेत. अशातच महायुतीचा मनसेला 1 ते 2 जागेवर लढण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. पण भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा महायुतीचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी फेटाळला आहे. महायुतीच्या या मागणीला मनसेने नकार दिला. त्यामुळे महायुतीकडून मनसेला पुन्हा नवीन प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. एक ते दोन दिवसांमध्ये पुन्हा नवीन प्रस्ताव देण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.


काही दिवसांपूर्वी मनसेच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मनसेला सोबत कसं घेता येईल, यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनसेच्या आणि आमच्या भूमिकेत फार अंतर नाही असे म्हटलं होतं. "मनसेने घेतलेली व्यापक भूमिका आमच्याशी विसंगत नाही. त्यामुळे क्षेत्रीय अस्मिता आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचे मुद्दे मांडले पाहिजे. सोबतच व्यापक भूमिका असावी असं आमचं मत होतं," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.