मुंबई: मुंबईत येऊन धडकलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या उलगुलान मोर्चाची गुरुवारी संध्याकाळी यशस्वी सांगता झाली. राज्य सरकारने या मोर्चाची दखल घेत आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत राज्य सरकारने या शेतकऱ्यांना तुमच्या सर्व मागण्यांची पूर्तता करू, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी उलगुलान आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारत लाँगमार्च काढला होता. अधिवेशनाचा मुहूर्त साधत गुरुवारी दुपारी हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात येऊन धडकला. यावेळी शेकडो आंदोलकांनी मैदानाबाहेरच ठिय्या आंदोलन केल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



साहजिकच या आंदोलनाचे पडसाद विधानसभेतही उमटले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. अखेर आज संध्याकाळी गिरीश महाजन यांनी आझाद मैदानावर आंदोलकांची भेट घेऊन सरकारकडून मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन सुपूर्द केले. पुढील तीन महिन्यात शेतकऱ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येतील, असे आश्वासनपत्रात नमूद केले आहे.



आंदोलकांच्या काय मागण्या होत्या?


स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात.
वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्यात.
दुष्काळी भागात तातडीने सरकारी मदत मिळावी.