ठरलं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी `या` तारखेला जाहीर होणार, `इतक्या` जागांवर ठाम
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. पण आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची यादी जाहीर होणार आहे.
Loksabha 2024 : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबाबत महत्त्वाची अपडेट समोर येतेय. राष्ट्रवादीची (NCP Ajit Pawar Group) पहिली यादी 28 मार्चला जाहीर होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. अजित पवार पक्ष 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha 2024) पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही, काही जागांवर अजूनही चर्चा सुरु आहे. दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सर्व आमदार आणि फ्रंटल अध्यक्षांची बैठक बोलावलीय. संगमवाडीच्या बोट क्लब इथं ही बैठक बोलावण्यात आलीय. मंगळवारी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचा पक्षप्रवेश होणार आहे तसंच लोकसभा उमेदवार निवडीबाबत आढावा घेतला जाणार आहे..
अढळराव पाटील राष्ट्रवादीत
माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मंगळवारी प्रवेश होणारेय. आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं हा पक्षप्रवेश सोहळा होणारेय. त्यावेळी शिवसेनेतील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारेत. अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत आढळरावांचा प्रवेश होईल. यावेळी होणाऱ्या सभेत शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटलांच्या नावाची घोषणा होणारेय.
बारामतीचा वाद मिटणार?
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत खलबतं झाली, रात्री 2 तास सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली. फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांना समज देण्यात आल्याची माहिती आहे. बारामतीतील महायुतीचा जो उमेदवार असेल त्यासाठी काम करा अशी समज फडणवीसांनी दिल्याची माहिती मिळतेय. महायुतीच्या उमेदवाराविरोधात कोणताही प्रचार करू नका... समर्थकांना सुद्धा तशी समज देण्याचे निर्देश फडणवीसांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. विधानसभेसंदर्भात वेळ आल्यावर घेऊ निर्णय घेऊ, आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा, अशी सूचना फडणवीसांनी केल्याचं समजतंय.
राम शिंदे-सुजय विखे पाटीलही वाद मिटला
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात प्राध्यापक राम शिंदे विरुद्ध सुजय विखे-पाटील हा वाद शमवण्यातही उपमुख्यमंत्री फडणवीसांना यश आल्याचं समजतंय. सुत्रांच्या माहितीनुसार विखे-पाटलांविरोधात राम शिंदेंनी तक्रारीचा पाढाच वाचला. विखेंविरोधात 7-8 तक्रारी शिंदेंनी केल्याची माहिती आहे. कशाप्रकारे अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झालं, अनेक कार्यक्रमात निमंत्रण नसल्याची तक्रार राम शिंदेंनी फडणवीसांकडे केली. सुत्रांच्या माहितीनुसार शिंदेंची समजूत काढत विखेंना राम शिंदे यांचा मान ठेवण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या. त्यानंतर विखे-पाटील आणि राम शिंदे यांच्यातलं भांडण मिटल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.