Loksabha 2024 Mumbai : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या वीस मे रोजी मुंबईतील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीचा (Mahayuti) प्रचार सुरु आहे. पण त्याचबरोबर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जाता आहेत. भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे गटावर मोठा आरोप केला आहे. महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्या प्रचार रॅलीमध्ये, बॉम्बस्फोटाचा आरोपी सहभागी झाल्याचा आरोप, भाजपकडून करण्यात आलाय. 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा (Ibrahim Musa) उर्फ बाबा चौहान यानं अमोल कीर्तिकर यांचा प्रचार केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यावरुन भाजपनं ठाकरे पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीसांची टीका
यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे. इंडिया आघाडी मतांच्या लांगुलचालना करता उज्ज्वल निकम यांचा विरोध करत कसाबचं महात्म्य गातायत आणि दुसरीकडे बॉम्बब्लास्टचा आरोपी त्यांच्या प्रचारात दिसतोय त्यामुळे देशविरोधी लोकांशी ठाकरे गटाने, काँग्रेसने आणि शरद पवारांच्या पक्षाने हातमिळवणी केलीय, हे स्पष्ट दिसतंय असा आरोप फडणवीस यांनी केलाय. 


उद्धव ठाकरेंची 'मशाल' दहशतवाद्यांच्या हाती
तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची मशाल दहशतवाद्यांच्या हाती असल्याचा आरोप केला आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण, टीपू सुलतान, औरंगजेबाचा उदो उदो मोठ्या प्रमाणात झाला आणि आता थेट मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या आरोपीकडून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे.  


हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 93च्या स्फोटानंतर मुंबईला संरक्षण दिलं, पण उद्धव ठाकरे याच स्फोटातील आरोपीची साथ घेत आहेत. आज वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? जनाब उद्धव ठाकरेंना थोडी तरी लाज वाटली पाहिजे! उद्धव ठाकरे तुमची 'मशाल' दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का? असा सवाल बावनकुळे यांनी विचारला आहे. 


अमोल किर्तीकरांचा पलटवार
ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी यावरुन भाजपवरच पलटवार केलाय. भाजपवाल्यांचं माझ्या कामावर भरपूर लक्ष आहे. त्यामुळे आम्ही पुढे आहोत असं वाटतं. प्रचार सुरु अताना त्या रॅलीत कोण असतं, कोण नसतं, त्यांना आम्ही बोलावलं नसतं. त्या व्यक्तीला मी ओळखतही नाही असं अमोल किर्तीकर यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यावर भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. मध्यप्रदेशातील भाजपचा पदाधिकारी टेररिस्ट फंड गोळा करत होता याची आठवण पटोलेंनी करुन दिली आहे. 


कोण आहे इक्बाल मुसा?
इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान अशी त्याची ओळख आहे. नातेवाईकच्या मदतीने दाऊदचा भाऊ अनिसशी इब्राहिमचा संपर्क झाला. इब्राहिम मुसा कुख्यात गुंड अबू सालेमलाही ओळखत असल्याची माहिती आहे. अभिनेता AK-56 आणि हँड ग्रेनेड दिल्याचाही इब्राहिम मुसावर आरोप आहे. अब सालेमला शस्त्र पुरवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर इब्राहिमला 10 वर्षांची शिक्षा आणि 2 लाख 77 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यत आला.  शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सध्या इब्राहिम मुसा ड्रायव्हिंग स्कूल चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.