Raj Thackeray on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईतील शिवतीर्थवर संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे. निमित्त आहे शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणाऱ्या महायुतीच्या सांगता सभेचं. महाराष्ट्रात पाचव्या आणि अंतिम टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात येत्या 20 मे रोजी निवडणूक होणाराय. या निवडणूक प्रचाराची सांगता शनिवारी होईल. त्याच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींची सभा होणाराय. राज ठाकरेंचंही भाषण या सभेत होणाराय. त्यामुळं सभेबाबतची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सभेआधी पंतप्रधान मोदी चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील. तसंच स्वातंत्रवीर सावरकर स्मारकात जाऊन नमन करतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करतील आणि बाजूलाच असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंनाही वंदन करणार आहे. यासाठी हे दोन्ही परिसर फुलांनी सजवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोद यांच्या सभेची शिवाजी पार्कवर जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधानांच्या सभेमुळे मुंबईतील सर्व जागा निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. तर विरोधकांचा सुपडासाफ होणार असल्याचंही ते म्हणाले.


गेल्या 10 वर्षात राज ठाकरेंचा मोदींबाबत असा झाला 'यु टर्न'
पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. राज ठाकरेंनी मोदींवर कधी टीकाही केली आणि तोंडभरून कौतुकही केलंय. त्यामुळे आज राज ठाकरे काय बोलणार...? महायुतीच्या सभेतून कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष आहे. गेल्या दहा वर्षात राज ठाकरेंनी पीएम मोदींबाबत कसा युटर्न घेतलाय यावर नजर टाकूया


वर्ष 2011 
राज ठाकरेंनी गुजरात दौरा करून तिथल्या विकासाचं आणि पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं


वर्ष 2014
मोदी सत्तेत आल्यानंतर राज ठाकरेंनी काही मुद्यांवरुन मोदींसह भाजपवर टीका केली


वर्ष 2019
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून मोदींची तुलना हिटलरशी केली. मोदींना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तशी राहुल गांधींनाही मिळायला हवी असं राज म्हणाले


वर्ष 2019
निवडणुकीच्या आधी लाव रे तो व्हिडिओमधून राज ठाकरेंची मोदींवर जोरदार टीका, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन भाजपविरोधात वातावरण निर्मिती केली. पुण्यात राज ठाकरेंनी शरद पवारांची एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रकट मुलाखत घेतली. राज-पवार मुलाखतीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी जवळीक साधत असल्याची चर्चा रंगली.


वर्ष 2019 
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेसह मविआचं सरकार सत्तेवर आलं. मविआ सरकारवर राज ठाकरेंनी टीका केली. त्यानंतर भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या


वर्ष 2020
बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी राज ठाकरेंनी मनसे पक्षाचा झेंडा बदलला. भगवा झेंडा आणि मध्ये राजमुद्रा असा झेंडा मनसेने स्विकारला. राज ठाकरे कट्टर हिंदुत्वाकडे वळत असल्याचा संदेश देखील या काळात दिला. गेल्या काही काळात राज ठाकरेंनी पुन्हा भाजप आणि मोदींशी जवळीक वाढवली. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेटही घेतली 


संजय राऊत यांची टीका
मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेवरून खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंवर घणाघात केलाय. महाराष्ट्रात कामं केली असती तर ज्यांनी शिव्या घातल्या त्यांनाच मांडीवर घेऊन बसावं लागलं नसतं. आता महाराष्ट्राचे स्वाभिमानी म्हणतायत त्यांनाच महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसावं लागतंय. त्यांची 4 जूननंतर सुपारीची दुकानं बंद होणार असा घणाघात राऊतांनी केलाय. तर शिवतीर्थावर मविआची सभा होऊ नये म्हणून मोदींना बोलावण्यात आल्याची टीका राऊतांनी केलीय.