Loksabha 2024 : दिल्लीत आज महायुतीची (Mahayuti) महत्त्वाची बैठक होणारेय. जागावाटपाबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यताय. अमित शाहा, जेपी नड्डांसोबत ही बैठक होतेय. शिंदे, फडणवीस, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्याआधी कालही दिल्लीत भाजप (BJP) कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. ही बैठक पाऊण तास चालली. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीसोबत दिल्लीत चर्चा केली.  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या घरी तब्बल पाऊण तास सुरू असलेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण मुंबईतल्या जागेवरुन रस्सीखेच
दरम्यान, दक्षिण मुंबईच्या (South Mumbai) जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरूय. दक्षिण मुंबईच्या  भाजप आग्रही आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांची नावे चर्चेत आहेत. तर ही जागा सोडण्यास शिवसेना तयार नाहीये,  शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि यशवंत जाधव लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत.


जागावाटपावरुन विरोधकांची टीका
महायुतीतील जागावाटपावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी टीका केलीय. भाजप वेळ पडल्यास 48 जागांवर निवडणूक लढेल असा दावा विनायक राऊतांनी केलाय. तर भाजपने सगळ्याच जागा लढवल्या तर नवल वाटायला नको, शिंदे गट, अजित पवार गटाचा अंत हा निश्चित आहे अशी टीका वडेट्टीवारांनी केलीय.


'उमेदवारांची यादी माझ्या खिशात'
लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे असा खळबळजनक दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलाय.. यावेळी त्यांनी पत्रकरांना चक्क मतदारसंघांची नावंही वाचून दाखवली.. मात्र थोड्याच वेळात याबाबत डिटेलमध्ये बोलतो, असं सांगत त्यांनी उमेदवारांच्या यादीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे... दरम्यान एकीकडे जागावाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना दुसरीकडे रावसाहेब दानवेंच्या या चिट्ठी बॉम्बमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. 


तर भाजपच्या बीड इथल्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम आहे. त्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील भर टाकली आहे. खासदार प्रीतम मुंडे, डॉक्टर भागवत कराड आणि माझी देखील उमेदवारी नक्की नसल्याचं दानवे म्हणालेत. भाजपात पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो अंतिम असतो असे सांगून उमेदवारी बाबतचा सस्पेन्स त्यांनी कायम ठेवलाय.


मराठा उमेदवार उभे राहाणार
आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांमुळं ईव्हीएमवर संक्रांत येण्याची शक्यता आहे. मराठा समाज मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. ईव्हीएमवर जास्तीत जास्त 384 उमेदवारांची निवडणूक घेणं शक्य आहे. त्यामुळं 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएमवर निवडणुका कशा घ्याव्यात, याबाबत मार्गदर्शन करावं, अशी मागणी करणारं पत्र धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली असल्याचं समजतंय.