वंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?
Loksabha 2024 : भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय. मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांमुळं मविआला फटका बसणार असून, भाजप-महायुतीचा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. नेमकं काय आहे यातलं वास्तव?
Loksabha 2024 : महाविकास आघाडीतून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीनं (Vanchit Bahujan Aghadi) लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत तब्बल 25 उमेदवार मैदानात उतरवलेत... अकोल्यामधून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) स्वतः लोकसभा निवडणूक लढवत आहेत.. भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, अशी शक्यता आहे... वंचित आणि भाजपची (BJP) छुपी युती (Hidden Alliance) झाल्याची चर्चाही यानिमित्तानं सुरू झालीय..
वंचितची भाजपशी छुपी युती?
पुण्यामध्ये वसंत मोरेंना (Vasant More) वंचितनं उमेदवारी दिलीय. त्यामुळं काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचं (Ravindra Dhangekar) भवितव्य धोक्यात आलंय. शिरूरमध्ये मंगलदास बांदल यांना वंचितनं मैदानात उतरवल्यानं राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंना दगाफटका होऊ शकतो
संभाजीनगरमध्ये अफसर खान आणि धुळ्यात अब्दुल रहमान असे 2 मुस्लीम उमेदवार वंचितनं दिलेत. त्याचा फटका मविआ उमेदवारांना बसू शकतो. सोलापूरमधून राहुल गायकवाड, हिंगोलीतून डॉ. बी. डी. चव्हाण, वर्धामधून राजेंद्र साळुंखे आणि परभणीतून बाबासाहेब उगळे यांच्यामुळं मविआ उमेदवार अडचणीत येऊ शकतात.
नाही म्हणायला कोल्हापूर आणि नागपूरमध्ये वंचितनं काँग्रेस उमेदवारांना उघड पाठिंबा जाहीर केलाय. सांगलीमध्ये प्रकाश शेंडगेंना समर्थन दिलंय. तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र वंचितच्या उमेदवारांमुळं राज्यातील अनेक मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध वंचित अशी तिरंगी लढत रंगणाराय. त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे...
2019 मध्ये काय घडलं?
2019 मध्ये वंचितनं एमआयएमसह 48 उमेदवार उभे केले. त्यात संभाजीनगरमधून एमआयएमचे इम्तियाज जलील हे एकमेव खासदार विजयी झाले. प्रकाश आंबेडकरांसह वंचितच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला
त्यावेळी 17 मतदारसंघात वंचितच्या उमेवारांनी 80 हजारांहून अधिक मतं मिळवली. सोलापुरात प्रकाश आंबेडकरांनी 1 लाख 70 हजार, तर अकोल्यात 2 लाख 70 हजार मते घेतली होती. तर सांगलीत गोपीचंद पडळकर यांनी 3 लाख मतं मिळवली. उस्मानाबाद, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, गडचिरोलीतही वंचितची कामगिरी चांगली होती. मात्र या मतविभाजनाचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला, तर फायदा भाजपला झाला.
आघाडीमुळं वंचितचे उमेदवार पडल्याचा उलटा दावा आंबेडकर करतात. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जुन्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं वंचित ही भाजपचीच बी टीम असल्याचा पुन्हा आरोप करण्यात येतोय.