Loksabha 2024 : अजित पवारांविरोधातील आक्रमक भाषा विजय शिवतारेंना (Vijay Shivtare) भोवण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून विजय शिवतारेंना कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice)पाठवण्यात आलीय. त्यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश शिवसेना शिस्तभंग समितीकडून (Shiv Sena Disciplinary Committee) देण्यात आले आहेत. बारामतीतल्या उमेदवारीवरून विजय शिवतारेंनी अजित पवारांना (Ajit Pawar लक्ष्य केलंय. त्यानंतर विजय शिवतारेंना महायुती धर्माचं पालन करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम
लोकसभा निवडणुकीत राज्यातली सर्वात प्रतिष्ठेची लढाई ठरलीय ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या नणंद आणि भावजय यांच्यामध्ये ही निवडणूक होणार आहे. मात्र दोन्ही पवारांना धुळ चारण्यासाठी महायुतीतल्या शिंदे गटाच्या विजय शिवतारेंनी दंड थोपटले आहेत. महायुतीमधल्याच मित्रांनी आव्हान दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीमध्येच कोंडी झाली आहे. अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय.  शिवतारे सातत्याने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. 


बारामतीमधील 5 लाख 80 हजार मतदार पवार विरोधक आहे. ते सुप्रिया सुळे, सूनेत्रा पवार यांना मत देऊ इच्छित नाहीत. त्यामुळे मतदारांना आवडत्या उमेदवाराला मत देण्याची संधी मिळायला हवी. पुरंदरचे लोक म्हणतात आम्हाला बदला घ्यायचा आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. देशातील एक मतदारसंघ असून, त्यावर कोणाची मालकी नाही. त्यामुळे स्वाभिमान जागरुक ठेवून लढलं पाहिजे असंही विजय शिवतारे म्हणाले आहेत. 


अजित पवार नाराज
आम्हीसुद्धा अरे ला कारे करु शकतो, मात्र आम्हाला वातावरण खराब करायचं नाही अशा शब्दांत अजित पवारांनी विजय शिवतारेंना सुनावल आहे. विजय शिवतारेंची स्क्रिप्ट कुणाची असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलाय. 


गोगावलेंचं धक्कादायक वक्तव्य
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची गरज नव्हती असं धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी केलंय. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने अडचण होत असल्याची जणू गोगावले यांनी कबूलीच दिलीय. आता सोबत घेतलंय तर त्यांनाही आपल्या बरोबरीने वागवणे गरजेचं आहे अशी सारवासारव गोगावले यांनी नंतर केलीय.