महाराष्ट्रात कुणाची बाजी, मविआ की महायुती? `या` हायव्होल्टेज लढतींकडे देशाचं लक्ष
Loksabha Result Maharashtra : लोकसभा निवडणुकीचे निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेत. मोदी विजयाची हॅटट्रिक करणार की इंडिया आघाडी मोदींचा विजयरथ रोखणार, हे पाहणं महत्त्वाचंय. महाराष्ट्रात नेमकं काय चित्र असणारे याचीही सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.
Loksabha Result Maharashtra : लोकसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विजयाची हॅटट्रिक करणार की इंडिया आघाडी सत्तेचा सोपान गाठणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. मोदींच्या विजयाचा महामेरू रोखण्यासाठी विरोधकांची एकी झाली. मात्र, देशातील जनतेनं कुणाला कौल दिलाय. हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.
देशाबरोबरच महाराष्ट्रात (Maharashtra Loksabha) नेमकं काय चित्र असणारे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण, राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर मविआ की महायुती, कोण बाजी मारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचंय. शिवसेनेतल्या फुटीनंतर राज्यातील जनता शिंदे की ठाकरे कुणाला पसंती देणार हे या निकालातून समोर येणार आहे. अजित पवारांच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेत. पहिल्यांदाच अजित पवार विरुद्ध शरद पवार अर्थात काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत कोण वरचढ ठरणार हे पाहणं महत्त्वाचंय. याशिवाय महायुतीत पुन्हा एकदा मोठा भाऊ म्हणून भाजप पुढे येणार का, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्यात.
महाराष्ट्रातल्या हायव्होल्टेज लढती
महाराष्ट्रातल्या हायव्होल्टेज लढतींकडेही सगळ्यांची नजर असणारे. बारामतीत नणंद विरुद्ध भावजयच्या लढाईत कोण बाजी मारणार, तीन पाटलांच्या लढाईत सांगलीचा गड कोण राखणार हे पाहणंही महत्त्वाचंय. माढ्यात रणजितसिंग नाईक निंबाळकर सत्ता राखणार की त्यांच्या गडाला मोहिते पाटील सुरूंग लावणार. कोल्हापुरातील जनता श्रीमंत शाहू छत्रपतींना निवडून देणार की संजय मंडलिक बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय. अमरावतीमधून नवनीत राणा गड राखण्यात यशस्वी होतात का, याकडे अनेकांचं लक्ष असणारे. तर बीडमधून पंकजा मुंडे संसदेत जाणार का, हे पाहणंही महत्त्वाचंय..
याशिवाय राज्यात 6 केंद्रीय मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि भारती पवारांच्या लढतीकडेही लक्ष लागलंय. अशा एक ना अनेक हायव्होल्टेज लढतींनी महाराष्ट्राची निवडणूक गाजलीय. आता प्रतिक्षा आहे महानिकालाची...आणि अर्थातच 4 जूनला दिवसभर निकालाचं सर्वात वेगवान आणि अचूक विश्लेषण तुम्ही पाहू शकणार आहात, झी 24 तास वर.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय. मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोटपणे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवरही बारीक लक्ष ठेवण्यात आलंय. मतमोजणीसाठी नेत्यांचीही तयारी सुरूये. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल.