आदित्य ठाकरेही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार?
निवडणुकीला उभं राहणारी ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती ठरणार आदित्य?
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू पार्थ पवार आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांच्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांचा पुत्र आदित्य ठाकरे हेदेखील लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जातेय.
शिवसेनेच्या 'युवासेना' विंगचे प्रमुख आदित्य ठाकरे हे उत्तर मध्य मुंबई किंवा उत्तर पश्चिम या लोकसभा मतदार संघामधून उभे राहतील, अशी शक्यताही व्यक्त केली जाऊ लागलीय.
उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. यामध्ये वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कुर्ला, कलिना, चांदिवली या विधानसभा मतदास संघांचा समावेश होतो. तर उत्तर पश्चिम हा शिवसेनेकडे आहे. यामध्ये दिंडोशी, अंधेरी पश्चिम, गोरेगाव, अंधेरी पूर्व, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व या विधानसभा मतदास संघांचा समावेश होतो. सध्या उत्तर मध्यमध्ये पूनम महाजन तर उत्तर पश्चिममध्ये गजानान कीर्तीकर खासदार आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, ठाकरे कुटुंबातून आजपर्यंत कुणीही निवडणूक लढवलेली नाही. परंतु, याआधी आदित्य ठाकरेंनी मुंबई जिल्हा फुटबॉल असोशिएशनची निवडणूक फक्त लढवलीच नाही तर जिंकलीसुद्धा... त्यामुळे, आदित्य लोकसभा निवडणुकीला उभं राहणारी ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती ठरणार का? याबद्दलही अनेकांना उत्सुकता लागून राहिलीय.
यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकदा आपण स्वत: निवडणुकीला उभं राहण्याची घोषणा केली होती परंतु, काही दिवसांतच ही घोषणा फोल ठरली... आणि निवडणूक लढण्याचा राज ठाकरेंचा उत्साह गळून पडला.