मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत खलबतं सुरू होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांची समजूत काढली. काल दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दरबारी रवींद्र गायकवाड पोहोचले. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उमरग्याचे आमदार ज्ञानेश्वर चौघुले, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पक्षासोबतच मित्रपक्षाच्या नेत्यांनाही सांभाळून घ्यावं लागतंय, ही त्यांची दुहेरी परीक्षा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवींद्र गायकवाड यांना न्याय देण्याचं आश्वासन या बैठकीत देण्यात आलंय. दुसरीकडे बैठकीत पालघरबाबतही चर्चा झाली. त्यानुसार आज शिवसेनेकडून पालघर लोकसभा मतदार संघासाठी राजेंद्र गावित यांचं नाव घोषित होण्याची दाट शक्यता आहे. तर आज दुपारी मातोश्रीवर राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा यांच्यात भेट होणं अपेक्षित आहे. वनगा आपल्या कार्यकर्त्यांसह पालघरमधून मातोश्रीकडे रवाना झालेत. 


दरम्यान, उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी न दिल्यानं त्यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र या भेटीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे ते 'मातोश्री'वरुन रागाने निघून गेले. मात्र आपण शेवटपर्यंत प्रयत्न सुरु ठेवणार असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.