Loksabha election 2024 : मुंबईत `ते` 28 लाख मतदार करु शकतात आघाडीत बिघाडी, महायुतीलाही बसेल फटका; नेमकं कारण काय?
Loksabha election 2024 : महायुती, मविआनं ठराविक उमेदवारांना अद्याप तिकीच दिलेलं नाही. कोण आहेत हे उमेदवार? त्यांचा 28 लाख मतदारांशी नेमका संबंध काय?
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आता प्रांताप्रांताचं राजकारण आणि त्यानिमित्तानं या राजकारणाचं समीकरण डोकं वर काढताना दिसत आहे. संपूर्ण देशात काही महत्त्वाचे मतदारसंघ आणि तिथं असणारी सत्ता थेट केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी जोडली जात आहे. याच यादीत मुंबई आघाडीवर आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या या शहरामधील प्रत्येक निकाल कोणाच्या कलानं जातो यावरून अनेक गोष्टी निर्धारित होणार आहेत.
मुंबईतील (Mumbai News) 6 लोकसभा मदतारसंघांवर येत्या काळात शहरातील एकदोन नव्हे तब्बल 28 लाख मतदारांची मतं प्रभाव पाडताना दिसणार आहेत. मुंबईत जवळपास 35 लाख उत्तर भारतीय वास्तव्यास असून त्यातील 28 लाख नागरिकांचं नाव मतदार यादीत आहे. उत्तर भारतीयांचा हा आकडा पाहता अद्याप महायुती किंवा महाविकासआघाडीनं कोणत्याही उत्तर भारतीय उमेदवाराला निवडणुकीसाठीचं तिकीट दिलेलं नाही, त्यामुळं या मतदारांची नाराजी यंदाच्या निवडणुकीच विजयाचं समीकरण एका क्षणात बदलू शकते.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार 2014 च्या निवडणुकीचा अहवाल पाहिला असता त्यावेळी उत्तर भारतीय मतदारांची साथ (BJP) भाजप ला होता. यंदा मात्र गुजराती आणि राजस्थानी उमेदवारांची नावं वगळता भाजपनं कोणत्याही उत्तर भारतीयाला मुंबईतून तिकीट दिलेलं नाही.
सत्तेचं समीकरण मुंबई ते दिल्ली
मुंबईतील उत्तर भारतीय मतदार ज्यांच्या बाजूननं त्यांची केंद्रात सत्ता असं एक अलिखित समीकरण तयार झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कधीकाळी काँग्रेसच्या हाताला साथ देणारा हाच उत्तर भारतीय वर्ग आता भाजपकडे वळला आणि देशातही भाजपची सत्ता पाय घट्ट रोवून उभी राहिली.
हेसुद्धा वाचा : भाऊ मुस्लीम, आई शीख, वडील ख्रिश्चन आणि पत्नी हिंदू; धर्म म्हणजे... विक्रांत मेस्सीनं मांडली खणखणीत भूमिका
मुळात या शहरात उत्तर प्रदेश, बिहार आणि त्या प्रांतातील विविध जात, पंथाचे नागरिक वास्तव्यास असून, शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचाही मोलाचा वाटा आहे. पण, आतापर्यंत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देश पातळीवर प्रतिनिधीत्वं करण्याची संधी देणारी उमेदवारी कोणाही उत्तर भारतीयाला देण्यात न आल्यामुळं या समाजानं काहीसा नाराजीचा सूर आळवला आहे. तेव्हा आता शहरातील हे 28 लाख मतदार नेमके कोणाच्या पारड्यात मतं टाकतात आणि कोणता पक्ष ही मतं आपल्या बाजूनं वळवून घेण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.