Vikrant Massey Birthday : '12th Fail' या चित्रपटानं प्रेक्षकांना जितकी भुरळ पाडली तितकीच किंबहुना त्याहून कैक पटींनी जास्त भुरळ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विक्रांत मेस्सी यानं पाडली. मालिका विश्वातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या या विक्रांत मेस्सीनं पाहता पाहता त्याच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं आणि यशाचं शिखर गाठलं. असा हा अभिनेता त्याच्या जीवनात काही गोष्टींबाबत आणि मुद्द्यांबाबत अतिशय स्पष्ट बोलतो. जात, धर्म, पंथ आणि समजुतींबाबतही त्याचे स्वत:चे काही विचार आहेत. एका मुलाखतीच्या माध्यमातून त्याचे हेच विचार सर्वांसमोर आले होते.
जिथं धर्म आणि पंथाच्या मुद्द्यावरून आजही अनेक ठिकाणी भेदभव केले जातता तिथं विक्रांतच्या कुटुंबात मात्र चित्र काहीसं वेगळं आहे. याविषयी सांगताना तो म्हणाला होता, 'माझ्या भावाचं नाव मोईन आहे, माझं नाव विक्रांत आहे. त्यानं इस्लाममध्ये धर्मांतर केलं आणि माझ्या कुटुंबानं त्याला ते करू दिलं. तुला यामध्ये सुख मिळतंय, तू ही गोष्ट कर असं त्याला कुटुंबातून सांगण्यात आलं'. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या भावानं इस्लाम स्वीकारल्याचं विक्रांतनं हल्लीच एका मुलाखतीत सांगितलं होतं.
''माझी आई शीख आहे, माझे वडील ख्रिश्चन आहेत. ते आठवड्यातून दोनदा चर्चमध्ये जातात. थोडक्यात धर्म, अध्यात्म यासंदर्भात मी फार कमी वयापासूनच खूप गोष्टी पाहिल्या. माझ्या भावाच्या निर्णयावरून अनेक नातेवाईकांनी 'तुम्ही ही परवानगी दिली कशी?' असा प्रश्न वडिलांना केला. पण, त्यांनी तुम्हाला याच्याशी काही घेणंदेणं नाही असं म्हणत तो माझा मुलगा असून, तो फक्त मला उत्तरदायी आहे आणि त्याला काय हवं ते करण्यासाठी ते स्वतंत्र आहे अशा शब्दांत त्यांनी नातेवाईकांना खडसावलं'', असं विक्रांतनं स्पष्ट करत कुटुंबाची विचारसरणी सर्वांपुढे मांडली.
कुटुंबातील एकंदर चित्र पाहता हे धर्म वगैरे काय असाच प्रश्न पुढे विक्रांतला पडू लागला आणि धर्म मानवनिर्मित संस्था आहे असा ठाम विचार त्यानं मांडला. मी काही गोष्टींना प्रचंड आदर देतो असं सांगताना त्यानं हिंदू संस्कृतीविषयी त्यानं आपला दृष्टीकोनही त्या मुलाखतीदरम्यान मांडला होता. आपल्या या विचारसरणीमागे माझा सांस्कृतिक पाया कारणीभूत आहे कारण, इथं कुठंही धार्मिक गोष्टी आड येत नाहीत. मुळात ही माझ्या देशाची संस्कृती आहे... देशात दिवाळी साजरा होते मी दिवाळी साजरा करतो, लक्ष्मीपूजा केली तरच लक्ष्मी घरात येईल असा माझा विचार नाही. पण, मी ही पूजा पाहत मोठा झालो आहे आणि ती माझी जीवनशैली आहे; अशा शब्दांत त्यानं आपली बाजू मांडली.
'माझा धर्म, पंथावर विश्वास नाही, पण मी आध्यात्मिक आहे', असं सांगताना या विश्वाला चालवणारी एक तरी शक्ती आहे यावर मात्र माझा विश्वास आहे त्यामुळं मी कायमच त्या शक्तीचा ऋणी आहे असा विचार त्यानं त्या मुलाखतीदरम्यान मांडला होता.