मुंबई :  भारतीय जनता पक्षाने 75 वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा (BJP) पक्ष संघटन मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनाही 75 वर्ष वयाचे कारण देऊन राजकारणातून बाजूला केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनाही याच नियमानुसार 75 वर्ष झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान करणार का? या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिळक भवन इथं पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात हिंदू-मुस्लीम, पाकिस्तान हे मुद्दे घेऊन धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला. पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम लोकसंख्या वाढली आहे असं नरेंद्र मोदी प्रचार सभेत म्हणाले. धार्मिक विभाजनाची भाषा करणे देशाच्या पंतप्रधानाला शोभत नाही. यातून जगात काय संदेश जातो, असा सवाल रमेश चेन्नीथला यांनी उपस्थित केला आहे. 10 वर्षात सरकारने काय काम केलं त्यावर नरेंद्र मोदी बोलत नाहीत. जनता मोदी सरकारच्या कारभाराला कंटाळली असून देशभर भाजपाविरोधी लाट आहे. लोकसभा निववडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होत असून इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला. 


17 मेला मुंबईत इंडिया आघाडीची सभा
लोकसभा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईतील बीकेसी मैदानावर 17 मे रोजी इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. तसंच 18 मे रोजी इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.


पीएम मोदींच्या दौऱ्यात काँग्रेस काळे झेंडे दाखवणार
दरम्यान, या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी भाजप आणि पीएम मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. याच प्रज्वल रेवन्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली आहेत. रेवन्नाचा भांडाफोड होताच त्याला भारतातून परदेशी पळून जाऊ दिले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले नाहीत. या अत्याचारी नराधमाला परदेशातून भारतात आणावे आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी अलका लांबा यांनी केली आहे.


महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाने नेहमीच पाठिशी घातले आहे, त्यांच्यावर कारवाई केली नाही. महिला खेळाडूंवर अत्याचार करणारा भाजपाचा खासदार ब्रिजभूषण सिंह याच्यावर कारवाई केली नाही. महिला काँग्रेसने आवाज उठवला,  सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला पण अद्याप कारवाई शून्य आहे. भाजपाने त्यांच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्द काढला नाही. कुलदिप सेंगर सारख्या बलात्कारी नेत्यांना भाजपाने संरक्षण दिले आहे अशी टीकाही अलका लांबा यांनी केली. 


महिला अत्याचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगले असून त्यांनी दोन शब्द बोलावे अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १५ मे व १७ मे रोजीच्या मुंबई दौऱ्यावेळी महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवून, मोदी मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध करणार आहे, असंही अलका लांबा यांनी जाहीर केलंय.