`योगी आणि राज ठाकरे काय बोलतायत त्यापेक्षा, आधी मजुरांकडे बघा`
काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला...
मुंबई : कोरोना परिस्थिती हाताळण्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरु असताना काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले. योगी आदित्यनाथ, राज ठाकरे हे कोणत्या प्रसंगी काय बोलले यापेक्षा गरीब मजूर लोकांना त्रास होत आहे, त्यांचे हाल होत आहेत याकडे बघितलं पाहिजे असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं आहे.
भविष्यात कोणत्याही राज्याला उत्तर प्रदेशातील कामगारांची गरज पडली तर त्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी लागेल, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी नुकताच दिला होता. योगींच्या या भूमिकेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत योगींना प्रतिइशारा दिला. राज ठाकरे यांनी, उत्तर प्रदेशातील कामगार हवे असल्यास आमच्या सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रात पाऊल ठेवता येणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
यापुढे महाराष्ट्रात येताना आमची परवानगी घ्यायची; राज ठाकरेंचा योगींना इशारा
याच मुद्द्यावरुन कृपाशंकर सिंह यांनी योगी आदित्यनाथ, राज ठाकरे काय बोलले यापेक्षा मजूरांना होत असलेल्या त्रासाकडे पाहिलं पाहिजे असा सूर आळवला. दरम्यान, कालपासून श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुनही रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालय महाराष्ट्राची तयारी असूनही कमी रेल्वेगाड्या सोडत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पियूष गोयल यांनी ट्विट करुन रेल्वे मंत्रालय सोमवारी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवायला तयार असल्याचं सांगितलं होतं.
राज्य सरकार म्हणते यादी पाठवली, पियुष गोयल म्हणतात मिळालीच नाही
कृपाशंकर यांच्या आधी सोमवारी सकाळी राष्ट्रीवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज्यपालांची भेट घेतली होती. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
शरद पवार आणि राज्यपालांच्या भेटीत काय घडले, प्रफुल्ल पटेल म्हणाले...