मुंबई :  राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री (Wine) करण्याच्या निर्णयावरून नव्या वादाची कीक बसली आहे. हा निर्णय घेण्यासाठी एका दारू सम्राटासोबत परदेशात डील झाल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावरून कसं राजकारण रंगलंय, चला पाहूयात. (lop devendra fadnavis criticizes decision of state government to sell wine in supermarkets in maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपर मार्केट तसंच मॉलमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. त्यावरून वादाचा प्याला भरभरून उसळू लागला आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिला. 


एवढंच नाही तर हा निर्णय घेण्याआधी दारूच्या कंपन्या असलेल्या एका मद्यसम्राटासोबत परदेशात डील झाल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केलाय. या मद्यसम्राटासोबत डील करायला परदेशात कोण गेलं होतं, असा सवाल त्यांनी केला आहे.


महसूल वाढीसाठी तसंच वाईनरी उद्योगाला, पर्यायानं शेतकऱ्यांना फायदा देण्यासाठी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेनं तोच युक्तिवाद रिपीट करत, विरोधकांवर निशाणा साधला आहे. या निर्णयाला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, अशी टीका शिवसेनेनं केली.


महाविकास आघाडी सरकारनं आधी चंद्रपूरमधली दारूबंदी उठवली. त्यानंतर विदेशी मद्यावरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णयही याच सरकारनं घेतला. आणि आता थेट सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं जाहीर केला आहे. त्यामुळंच सरकारला सत्तेची नशा चढल्याची टीका होऊ लागली आहे. हा वादाचा प्याला रिचवताना सरकारच्या तोंडाला फेस येणार, एवढं नक्की.