मुंबई : महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा शरद पवारांच्या अवतीभवती फिरू लागलंय. भाजप असो की मनसे, विरोधकांनी पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. पवारांवरच सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप का होतायत, पाहूयात हा रिपोर्ट. (lop devendra fadnvis critisize to ncp chief shard pawar via tweet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार, वयाच्या 81 व्या वर्षीही सक्रीय असलेले राजकारणातले बडे नेते. गेल्या सहा दशकांपासून केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या राजकारणात गाजत असलेलं व्यक्तिमत्त्व.



महाविकास आघाडीचे सुपर सीएम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांवर दररोज नवनव्या आरोपांच्या फैरी झाडल्या जातायेत. कधीकाळी त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करणारे राज ठाकरे आता पवारांवरच जातीयवादाचा आरोप करतायेत.


केवळ मनसेच नव्हे तर प्रमुख विरोधी असलेल्या भाजपनंही शरद पवारांवर जातीय ध्रुवीकरणाचा आरोप केलाय. देवेंद्र फडणवीसांनी एकापाठोपाठ एक 14 ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधलाय.


फडणवीसांचा पवारांवर ट्विटर बाण


नवाब मलिक मुस्लीम असल्यानं दाऊदशी संबंध जोडल्याचा आरोप पवारांनी केला.


बाबासाहेब आंबेडकरांचा 370 कलमाला विरोध असताना राष्ट्रवादीनं संदिग्ध भूमिका घेतली.


इशरत जहाँ निर्दोष असल्याचा दावा पवारांनी केला. 


2012च्या आझाद मैदानात हिंसाचारप्रकरणी रझा अकादमीविरोधात कारवाईत ढिलाई केली. 


हिंदू टेरर शब्दप्रयोग सर्वात आधी कुणी वापरला?


संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नसतानाही मुस्लीम आरक्षणासाठी सातत्यानं पुढाकार घेतला. 


काश्मीर फाईल्समध्ये पंडिंताच्या वेदनांचं चित्रण असतानाही शरद पवारांनी दुटप्पी भूमिका घेतली. 


फडणवीसांचे हे ट्विटर बाण हेच संकेत देतायत की, विरोधकांचं लक्ष्य आता पवार हेच असतील.


...असे टीकेचे बाण फडणवीसांनी सोडले


राजकारणात कळसावर असलेल्या व्यक्तीलाच नेहमी टीकेचा सामना करावा लागतो. राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनीही पवारांवर आरोप करून तेच महाविकास आघाडीचे प्रमुख असल्याचे संकेत दिलेत. येत्या निवडणुकीत पवार पुन्हा जड जाऊ शकतात, म्हणूनच की काय त्यांना टार्गेट करण्याची व्यूहरचना विरोधकांनी आखलेली दिसते.


गेल्या निवडणुकीत साताऱ्यात त्यांनी भर पावसात सभा घेतली आणि विरोधकांचे सत्तास्थापनेचे मनोरथ अक्षरशः वाहून गेले. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले असतानाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मोट बांधली आणि ते महाविकास आघाडीचे शिल्पकार ठरले. 


उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरीही शरद पवार हेच महाविकास आघाडी सरकारचा कणा आहेत. त्यामुळंच पवारांना टार्गेट करून महाविकास आघाडीची पाळंमुळं खिळखिळी करण्याचा नवा राजकीय प्लॅन विरोधकांनी आखलेला दिसतोय.