Mhada Lottery 2024: मुंबईत हक्काचं घर व्हावं  अशी अनेकांची इच्छा असते. मुंबईकरांचे घराचं स्वप्न म्हाडाच्या मदतीने पूर्ण होतं. म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2024साठी लॉटरी काढली आहे. 2030 घरांसाठी सोडत काढली असून येत्या 8 ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही सोडत काढण्यात येणार आहे. यापूर्वी 13 सप्टेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. मात्र आता सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाने 2030 घरांसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवज्यात जाहिरात प्रसिद्ध केली होती. ९ ऑगस्टपासून अर्ज विक्री स्वीकृतीस सुरुवात केली होती. तर, सोडतीच्या मुळ वेळापत्रकानुसार ४ सप्टेंबर ही अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती. त्यानंतर पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून १३ सप्टेंबर रोजी सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार होता. अर्ज विक्री - स्वीकृतीस एक आठवडा शिल्लक होता. त्याच वेळी मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ दिली.


अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ दिल्याने 13 सप्टेंबरची मुदतदेखील पुढे ढकलण्यात आली आहे. मुदतवाढीनुसार १९ सप्टेंबर ही अर्ज विक्री-स्वीकृतीची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली. मात्र पात्र अर्जदारांची प्रारूप यादी, अंतिम यादी आणि सोडतीचा निकाल कधी जाहीर होणार हेही जाहीर करण्यात आले नव्हते. आता मुंबई मंडळाने 8 ऑक्टोबर रोजी सोडतीला निकाल जाहिर होणार असल्याची माहिती दिली आहे. 


३ ऑक्टोबरला पात्र अर्जदारांची अंतिम यादी


अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया संपल्यानंतर अर्जाची छाननी करून २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पात्र अर्जदारांची अंतिम यादी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे. संकेतस्थळावर गुरुवारी वेळापत्रक प्रसिद्ध केले. या वेळापत्रकानुसार ८ ऑक्टोबर रोजी सोडत जाहीर होणार आहे. तर संगणकीय पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत १९ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वाजून ५९ मिनिटे अशी असणार आहे.