कृष्णात पाटील/सुनील घुमे, मुंबई : बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कसा धांगडधिंगा घालण्यात आला, याचा धक्कादायक व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागला. हा व्हिडिओ दाखविण्यात आल्यानंतर खुलेआम नोटांची उधळपट्टी करणाऱ्या बेस्टच्या या १२ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु झाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या डान्सबार प्रमाणे महिलांचा हिडीस नाच आणि त्यावर होणारा दौलतजादा. पण ही दृश्य बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारातली. आणि या व्हिडिओत जे नाचताना दिसतायत ते आहेत बेस्टचे अधिकारी. दसऱ्याच्या निमित्तानं एफ दक्षिण ग्राहक सेवा केंद्राच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात हा धांगडधिंगा सुरु होता. 


बेस्टमध्ये कामाला असलेली अभिनेत्री माधवी जुवेकर तोंडात नोटा धरून डान्स करतेय आणि बेस्टचे अधिकारी तिच्यावर नोटा उधळतायत. हा सगळा डान्सिंग ड्रामा बेस्टच्या कर्मचा-यांनी मोबाईलमध्ये शूट केला आणि बेस्ट प्रशासनाकडं त्याबाबत तक्रार केली. 


बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी तातडीनं याबाबतची चौकशी करण्याचे आदेश सुरक्षा आणि दक्षता विभागाला दिले. दरम्यान, डान्सच्या वेळी वापरलेल्या नोटा खोट्या असल्याची सारवासारव अभिनेत्री माधवी जुवेकर यांनी केली आहे.


माधवी जुवेकर यांच्यासह नोटांची उधळपट्टी करणाऱ्या १२ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. याबाबतचा अहवाल बेस्ट प्रशासनाकडं पाठवून देण्यात आला. मात्र बेस्ट आगाराचा डान्स बार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही. दरम्यान, चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही बेस्ट समिती अध्यक्षांनी दिलीय.


एकीकडं बेस्टचं चाक आर्थिक तोट्यात अडकलंय. कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार वेळेवर मिळत नाही, असं असताना बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून नोटांची उधळपट्टी केली जात असल्याचा हा व्हिडिओ संतापजनक असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की, राजकीय वरदहस्तामुळं त्यावर पांघरूण घातलं जाणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.