दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: चीनमधील बड्या उद्योगांबरोबर नुकत्याच करण्यात आलेल्या पाच हजार कोटी रुपयांच्या तीन करारांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आहे. चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीत हे करार स्थगित करण्यात आले आहेत. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा झाल्यानंतर हे करार स्थगित करण्यात आल्याची माहित उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीस सरकार काळातील उद्योग करारांच्या फेरआढाव्यास सुरुवात


मॅग्नेटीक महाराष्ट्र 2 अंतर्गत राज्यातील उद्योग विभागाने 15 जून रोजी व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे जगभरातील विविध कंपन्यांशी 16 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. या 16 हजार कोटी रुपयांपैकी 5 हजार कोटी रुपयांचे करार तीन चीनच्या कंपन्यांशी करण्यात आले होते. चीन आणि भारताच्या सीमेवर 20 जवान शहीद होण्याच्या आधी हे करार करण्यात आले होते.


मात्र सीमेवर 20 जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. त्यामुळे चीनच्या कंपन्यांबरोबर केलेल्या या करारांचं काय करायचं याचा सल्ला राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागितला होता. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार चीनच्या कंपन्यांबरोबर करण्यात आलेले करार स्थगित करण्यात आले आहेत. तर यापुढे चीनच्या कंपन्यांबरोबर कोणतेही करार न करण्याचा सल्लाही दिला आहे.चीनच्या कंपन्यांबरोबर व्हिडोओ कॉन्परसिंगद्वारे झालेल्या कराराच्यावेळी चीनमधील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर चीनचे भारतीय दूत सन विडोंग उपस्थित होते. 

चीनच्या कंपन्यांबरोबर राज्य सरकारने 15 जून रोजी खालील करार केले होते
* ग्रेट वॉल मोटर्स (जीएमडब्ल्यू) या वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनीबरोबर ३ हजार ७७० कोटींचा करार, या कराराअंतर्गत जीएमडब्ल्यू पुण्यातील तळेगाव इथं वाहननिर्मितीचा कारखाना उभारणार होती. 
* देशातील पीएमआय इलेक्ट्रो मोबॅलिटी या कंपनीने फोटॉन या चिनी कंपनीबरोबर 1 हजार कोटीचा उद्योग सुरु करण्यासंदर्भात करार केला होता.
*  हेन्गेली इंजिनियरिंग या चीनच्या कंपनीने राज्य सरकारबरोबर २५० कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात करार केला होता.