दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : उद्या मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचेही निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही. २०१६ मध्ये झालेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमाचे निमंत्रणही ठाकरे यांना देण्यात आले नव्हते. 


स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमातही आमंत्रण नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा शिवसेना - भाजपामध्ये मानापमान नाट्य रंगले होते. त्यापूर्वी इंदू मिलमध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमातही उद्धव ठाकरेंना निमंत्रण नसल्याने शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.


नाणार प्रकल्पाचा करार होणार का? 


शिवसेनेने तीव्र विरोध केलेल्या कोकणातील नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचा सामंजस्य करार मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक लाख रोजगार उपलब्ध करून देणारा हा मोठा. प्रकल्प आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाणार प्रकल्पाचा करार न करण्याची मागणी केली होती. 


शिवसेनेचा विरोध असूनही प्रकल्प


मुख्यमंत्र्यांनीही हा करार केला जाणार नाही, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र या प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता शेवटच्या क्षणापर्यंत या प्रकल्पाचा करार व्हावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी शिवसेनेचा विरोध असूनही कोकणातीलच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग हे प्रकल्प सरकारने रेटले आहेत. 


शिवसेनेचा या तीनही प्रकल्पांचा विरोध मावळला


कालांतराने शिवसेनेचा या तीनही प्रकल्पांचा विरोध मावळला आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री आणि सरकार काय भूमिका घेणार याबाबत अजूनही उत्सुकता आहे. उद्योग विभागातील अधिकार्‍यांच्या माहितीनुसार सध्या तरी नाणार प्रकल्पाचा सामंजस्य करार मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये होणाऱ्या कराराच्या यादीत नाहीत. मात्र सरकार शेवटच्या क्षणी काय करणार याबाबत मात्र संभ्रम आहे.