Maharashtra Assembly : बंडखोरी करून भाजपच्या (BJP) साथीने स्थापन झालेल्या शिंदे सरकारची (Shinde Government) आज पहिली कसोटी आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शिंदे सरकार आज अध्यक्षपदाची निवड आणि विश्वासदर्शक ठराव या माध्यमातून शिंदे सरकार शक्तीप्रदर्शन करेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज अध्यक्षांची निवड आणि सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर आणि शिवसेनेकडून राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. विधानसभेत सरकारला 170 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय. त्यामुळे राहुल नार्वेकर निवडून येण्यात अडचण येणार नाही. अध्यक्षपदासाठी नव्या नियमानुसार आवाजी पद्धतीने मतदान होणार आहे. उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव पुकारल्यावर सदस्यांनी उभे राहून मत नोंदवायचं आहे.


या निवडणुकीत व्हिपवरून शिवसेना आणि शिंदे गटात जुंपण्याची शक्यता आहे. बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेनेचे आमदार विधानसभेत आमने-सामने येणार आहेत. शिवसेनेकडून शिंदेंसह सर्व आमदारांना व्हिप जारी करण्यात आलाय. पण, प्रतोद सुनील प्रभूंचा व्हिप आम्हाला लागू होत नसल्याचा दावा शिंदे गटाने केलाय. त्यामुळे पक्षादेशावरून बंडखोर आणि शिवसेनेत संघर्षाची शक्यता आहे.


दुसरीकडे पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व पक्षांना समान न्याय दिला जाईल, असं विधानसभा अध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.


तर अर्ज दाखल केल्यानंतर राजन साळवी यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.  शिवसेनेच्या व्हीपनुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते राजन साळवी म्हणाले आहे.


दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. सकाळी 10 वाजता सर्व आमदारांची विधानभवनात बैठक होणार आहे. अध्यक्ष निवडणूक, विश्वासदर्शक ठरावाबाबत खलबतं सुरू झालीत शिवसेनेतील बंडामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.