Maharashta Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धडा शिकवण्यासाठीच झाला होता असा गौप्यस्फोट भाजपचे जेष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Munangitwar) यांनी केला आहे. भाजपशी युती करुन निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्याप्रकारे वागले, त्यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन घेतले आणि शपथविधी घडवून आणला, असे सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार यांच्या या विधानावरुन आता राज्यातलं वातावरण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याबाबत भाष्य करत सुनीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार?


लोकसत्ता वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधान केले आहे. "भाजपशी युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वागले, त्यांना धडा शिकविण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन आम्ही घेतले आणि पहाटेचा शपथविधी झाला. मी १६ मार्च १९९५ रोजी निवडून आलो होतो. त्या वेळी आम्ही शिवसेना नेत्यांबरोबर एकवीरा देवीच्या दर्शनाला गेलो होतो. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला काँग्रेसबरोबर जाणार नाही किंवा मदत करणार नाही, अशी शपथ दिली होती. पण उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले," असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.


राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया


राज ठाकरे यांनी अंबरनामध्ये माध्यमांसोबत बोलताना याबाबत भाष्य केले. "तुमच्याकडून चूक झाली ती झाली. उगाच कोणाला धडे शिकवायला जाऊ नका. तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण झालं. त्यामुळे तुम्ही आता सारवा सारव करण्याला अर्थ नाही," असे राज ठाकरे म्हणाले.


भाजपची खेळी योग्यच - संजय शिरसाट


"पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी झाला होता हे बरोबर आहे, त्यात चुकीचं काहीच नाही. मुळात तुम्ही (शिवसेना) भाजपसोबत निवडणूक लढता. प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून लोकांची मतं मागता. पण निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाता. त्यांना सत्तेची लालसा वाटली. त्यामुळे यांनी दुसरीकडे जायचा निर्धार केला तेव्हा भाजपाने केलेली ही खेळी योग्यच होती," असे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिलीय.


एकनाथ शिंदेंबरोबर जाऊन चांगलाच धडा शिकला - सुषमा अंधारे


"मुनगंटीवार यांनी धडा शिकवण्याचा भाषा केली. पण, एकनाथ शिंदेंबरोबर जाऊन त्यांनी चांगलाच धडा शिकला आहे. म्हणून त्यांना आपण आगीतून उठून फुफूट्यात पडलो, असं वाटत असेल. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर अजून धास्ती घेतली आहे. एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याने त्यांची नकारात्मकता वाढत आहे," असा टोला सुषमा अंधारो यांनी लगावला आहे.