Omicron चा धोका : देशात रात्री लॉकडाऊन लागणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत संकेत
देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत, त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session) आजचा दुसरा दिवस आहे. या अधिवेशनात काही सदस्य विनामास्क फिरताना दिसत आहेत. या वरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
कालपासून अधिवेशन सुरु झालं, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पण काही मोजके वगळता इथे कुणी मास्क वापरत नाहीत, मी बोलतानाही मास्क घालतो, पण काही जणांना मास्कमध्ये बोलताना अडचण होते, पण बोलून झाल्यानंतर तरी मास्क घाला असं आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलं.
मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढवं अशी मागणीदेखील अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
देशात कोरोनाच्या (Corona Virus) संकटावर पंतप्रधान मोदीही (PM Narendra Modi) गांभीर्याने विचार करत आहेत. देशपातळीवर रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे. पण इथे सभागृहात काही ठराविक सोडले तर काही जण मास्क अजिबात वापरत नाहीत. अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
तर मलाही बाहेर काढा?
परदेशात कोरोनाच्या नव्या विषाणूची वाईट परिस्थिती आहे. परदेशात रुग्ण दुप्पट होत आहेत, WHO नेही चिंता व्यक्त केली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. हे झालं परदेशाचं आपल्या देशाचं आणि महाराष्ट्राचं काय, काही गोष्टी त्या वेळीच गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. कुणी जर मास्क लावला नसेल तर बाहेर काढा, मी मास्क घातला नसेल तर मलाही बाहेर काढा, कृपा करुन ही गोष्ट लक्षात घ्या अशी विनंती अजित पवार यांनी केली.
केंद्राने केलं राज्यांना सतर्क
ओमायक्रॉनचा (Omicron) धोका वाढत असला तरी लोक याबद्दल फारसे गंभीर नाहीत. ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ओमायक्रॉन विषाणू डेल्टापेक्षा (Delta) तिप्पट पटीने संसर्गजन्य असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. राज्यांनी परिस्थिती पाहून नाईट कर्फ्यू (Night Curfue) आणि कंटेनमेंट झोन तयार करणं यासारख्या आवश्यक उपाययोजनांसाठी सतर्क राहावं, असं निर्देश केंद्राने दिले आहेत. गेल्या 18 दिवसांत ओमायक्रॉन बाधितांची संख्या 100 पटीने वाढली आहे.
राज्यांनी जिल्हा स्तरावर वॉर रुम कराव्यात
केंद्र सरकारने राज्यांना ओमाक्रॉनसाठी वॉर रूम तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. ओमायक्रॉन विषाणू वेगाने पसरत आहे. साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास किंवा आयसीयू बेड 40 टक्क्यांहून अधिक भरले असल्यास, जिल्हा किंवा स्थानिक स्तरावर नाईट कर्फ्यू किंवा कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी त्वरित पावले उचलली जावीत असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.