मुंबई : भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची आज दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीसांची भाजपा विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी या बैठकीत निवड करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना उपस्थित राहातील. दरम्यान शपथविधीचा ३१ ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार आहे. ३ नोव्हेंबरनंतर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे अशी माहिती मिळत आहे. त्यापूर्वी १ किंवा २ नोव्हेंबरला अमित शाह मुंबईत येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावर भाजपानं दावा पक्का केलाय. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेला कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. पुढची पाच वर्ष भाजपाचाच मुख्यमंत्री राहणार असं फडणवीसांनी सांगितलंय. फडणवीसांच्या या दाव्यानं शिवसेनेचा तिळपापड झालाय. भाजपाच्या भूमिकेमुळे युतीची बैठकही रद्द केल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. मात्र भाजपानं अशी कोणतीच बैठक ठरली नसल्याचं सांगून शिवसेनेच्या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं सांगत मुख्यमंत्रीपदाचा चेंडू अमित शाहांच्या कोर्टात गेल्याचं भाजपानं सांगितलंय.  



सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाकडून शिवसेनेला अजूनही उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आलेली नाही. मात्र उपमुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेनेनं केल्यास भाजपा चर्चेसाठी तयार आहे असं भाजपाच्या गोटातून सांगण्यात येतंय. दरम्यान मुख्यमंत्रीपद पाच वर्षे स्वतःकडे ठेवण्यावर भाजपा ठाम आहे.