ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काही राजकीय समीकरणं मोठ्या फरकानं बदलताना दिसली. काही अनपेक्षित पक्षप्रवेशही झाले. त्याचीच पुनरावृत्ती राज्यातील विधानसभा निवडणुकीतही होण्याची चिन्हं असल्याचं म्हटलं जात आहे. ही पुनरावृत्ती असेल बिनशर्त पाठिंब्याची. (Maharashtra Assembly Election 2024)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता. ज्यानंतर आता निवडणुकीच्या माहोलात भूमिका बदलणार असून, महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


शिवडी, वरळी, माहिमसह इतर काही मतदारसंघांवर यासंदर्भातील चर्चाही झाल्याचं म्हटलं जात आहे. मनसेला काही जागांवर महायुती समर्थन देणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये यासंदर्भातील चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. शनिवारी मध्यरात्री शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये याच धर्तीवर जवळपास 2 तास चर्चा झाली असून, आता खरंच लोकसभेच्या 'बिनशर्त'ची विधानसभेला परतफेड? होणार का, महायुती हा निर्णय घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मनसेची पहिली यादी सोमवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, या यादीत 33 ते 36 जणांची नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या यादी बाबतही चर्चा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.