Maharashtra Assembly Elections 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक (Maharashtra Vidhansabha Election 2024) जाहीर केलं. सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. 20 नोव्हेंबरला राज्यातल्या विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या आधी 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत अर्जांची छाननी होणार आहे. तर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्या विभागात किती जागा?
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आहे. यानुसार कोणत्या विभागात किती जागा आहेत त्यावर एक नजर टाकूया
मुंबई : - 36 जागा
कोकण-ठाणे - 39 जागा
खान्देश - 47 जागा
मराठवाडा - 46 जागा
पश्चिम महाराष्ट्र - 58 जागा
विदर्भ - 62 जागा


2019 विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती आमदार?
भाजप – 105 आमदार
शिवसेना – 56 आमदार
राष्ट्रवादी – 54 आमदार
काँग्रेस – 44 आमदार
बहुजन विकास आघाडी – 03 आमदार
प्रहार जनशक्ती – 02 आमदार
एमआयएम – 02 आमदार
समाजवादी पक्ष – 02 आमदार
मनसे – 01 आमदार
माकप – 01 आमदार
जनसुराज्य शक्ती – 01 आमदार
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 आमदार
शेकाप – 01 आमदार
रासप – 01 आमदार
स्वाभिमानी – 01 आमदार
अपक्ष – 13 आमदार


शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षांचं संख्याबळ
भाजप- 103  आमदार
शिवसेना शिंदे पक्ष- 40 आमदार
शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष - 15 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष - 43 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष - 10 आमदार
काँग्रेस- 43 आमदार
इतर - 34 आमदार


2019 ते 2024 - महाराष्ट्राच्या राजकारणाची वादळी 5 वर्ष
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाचे टप्पे आपण पाहिले असतील... पण 2019 ते 2024 ही पाच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी होती. महाराष्ट्राच्या राजकारणात वादळं आणणाऱ्या या पाच वर्षांनी राजकारणातील आडाखे, ठोकताळे धुळीस मिळवले. राजकीय पंडितांची सगळी गणितांची मांडणीच मोडीत काढणाऱ्या या पाच वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या वळणार आणून ठेवलं.


शिवसेना-भाजपची महायुती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी  अशा निवडणुका झाल्या.... फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात शिवसेना खिशात राजीनामे घेऊन फिरत होती. निवडणुकीच्या निकालात भाजप स्वबळावर जादुई आकडा गाठत नाही कळल्यावर शिवसेनेनं अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. भाजपनं आक्रमक पवित्रा घेतल्यावर संजय राऊतांनी शिवसेनेसमोर सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं. इथूनच महाराष्ट्रातील सत्तानाट्याच्या 38 दिवसांच्या अंकाला सुरुवात झाली.


 महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नव्या मांडणीची ही सुरुवात होती. उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेच्या मांडणीची चर्चा सुरु असताना 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसह शपथ घेतली. फडणवीसांचं हे सरकार फक्त अडीच दिवसांचं होतं. अजित पवारांनी शरद पवारांकडं घरवापसी केली होती.  28 नोव्हेंबर 2019ला महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. ठाकरे सरकार सत्तेवर येऊन दोन महिने होत नाही तोच जगभरात कोरोनाची साथ आली. उद्धव ठाकरे सरकारनं कोरोनाचा सामना केला. पण याच काळात ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं होतं.


29 जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दुसऱ्याच दिवशी महायुती सरकार सत्तेत येणार हे स्पष्ट झालं. महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता निर्माण झाली. देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असताना एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.