मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षासाठी पुढचे ४८ तास फार महत्त्वाचे असल्याचं पुढं आलंय. भाजपानं चर्चेची सर्व दारं बंद केल्याची माहिती शिवसेना सूत्रांनी दिलीय. त्यामुळे भाजपाकडून प्रतिसादासाठी पुढचे केवळ ४८ तास प्रतीक्षा करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवसेना 'प्लान-बी'वर काम सुरू करणार असल्याचं शिवसेनेतल्या विश्वसनीय सूत्रांनी 'झी २४ तास'ला सांगितलंय. शिवसेनेच्या 'प्लान-बी'नुसार भाजपासोबत फिसकटल्यास शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेससमोर सत्ता स्थापनेचा प्रस्ताव ठेवणार आहे. तसंच काँग्रेसचं बाहेरून समर्थन घेणार असल्याचंही सूत्रांनी सांगितंलय. सध्या वाढलेला तिढा वाहता शिवसेनेनं 'प्लान-बी'वरच 'प्लान-ए' म्हणून काम सुरू केलंय.


शिवसेनेची आक्रमक भूमिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेचा निकाल लागून १३ दिवस उलटले तरी सत्तेचा तिढा सुटायला तयार नाही. उलट शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर दिवसेंदिवस आक्रमक भूमिका घेताना दिसतेय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. एवढंच नव्हे तर राज्यातील राजकारणाचा चेहरा बदलणार असल्याचा टोलाही त्यांनी भाजपाला नाव न घेता लगावलाय. आपण नव्हे तर इतर पक्षही पवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही भाजपाला हाणलाय. तर दुसरीकडे, शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बहुमत नसल्यामुळे भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करणं टाळणार आहे. त्यामुळे शिवसेना चर्चेसाठी कोंडी कधी फोडणार याची भाजपा प्रतीक्षा करत आहे. यानिमित्तानं भाजपा शिवसेनेच्या संयमाची परीक्षाच घेणार असल्याचं समजतंय.


सत्तास्थापनेचं वेगळं समीकरण?


राज्यात सत्तास्थापनेचं वेगळं समीकरण जुळण्याची शक्यता निर्माण झालीय. तसे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. शिवसेना भाजपा सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले, तर कुणाला तरी सरकार बनवावं लागेल. त्यामुळे आमच्याकडे कुणाचा प्रस्ताव आला तर त्यावर नक्की विचार करणार असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. तर काँग्रेसनं कोणतीही रणनीती बनवलेली नसून 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतल्याचं सांगितलं.


काँग्रेस द्विधा मनस्थितीत


शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेस द्विधा मनस्थितीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संख्याबळाशिवाय दावा कसा करणार असा सवाल सोनिया गांधींनी कालच्या दिल्लीतल्या बैठकीत पवारांना केलाय. त्यामुळे काँग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याचं पुन्हा समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र याबाबत आग्रही असल्याचं समजतंय. त्यामुळे पुन्हा शरद पवार सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.



भाजपाच्या बैठकी सुरू


मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा इथं भाजपाच्या प्रमुख नेत्यांची गेल्या दोन तासांपासून बैठक सुरू आहे. बैठकीला केंद्रीय सहसंघटनमंत्री व्ही सतीश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे उपस्थित आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस भाजपामधील त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्लीतल्या चर्चेबाबत माहिती देणार आहेत. तसंच त्यांच्याबरोबर पुढील राजकीय पावलं उचलण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.