आताची मोठी बातमी! शिंदे सरकार पहिल्या परीक्षेत पास, विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर विजयी
शिंदे गट-भाजप पहिल्या परीक्षेत पास, शिवसेनेचं व्हिप झुगारलं, महाविकास आघाडीला मोठा धक्का
Maharashtra Assembly : बंडखोरी करून भाजपच्या (BJP) साथीने स्थापन झालेलं शिंदे सरकार (Shinde Government) आज पहिली कसोटी पास झालं आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिंदे सरकारने बाजी मारली. भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि शिवसेनेकडून राजन साळवी यांच्यात लढत होती. यात राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. राहुल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं पडली. तर राजन साळवी यांना 107 मतं पडली. शिवसेनेनं बजावलेलं व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांनी राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केलं.
अध्यक्षपदासाठी नव्या नियमानुसार आवाजी पद्धतीने मतदान झालं. मनसे आणि बहुजन विकास आघाडीने भाजपच्या बाजूने मतदान केलं. तर एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.
कोण आहेत राहुल नार्वेकर
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं. या जागेसाठी भाजपने कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली होती. राहुल नार्वेकर हे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत.
शिवसेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर एकेकाळी शिवसेनेत असलेले राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदी उमेदवारी देण्यात आली. राहुल नार्वेकर हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पण लोकसभा निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये पहिल्यांदाच ते कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले.
राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते. तर भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. राहुल यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक 226 मधून नगरसेविका आहेत.
सासरे सभापती, जावई विधानसभाअध्यक्ष
आणखी एक योगायोगा म्हणजे राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं सर्वोच्च पद हे एकाच कुटुंबात जाण्यचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे विधान परिषदेचे सभापती आहेत. तर आता राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाले आहेत.