Maharashtra Budget Session : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर केला.  यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला आहे. अडिच वर्ष फक्त घोटाळे, टेंडर, कमिशन, टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या (Budget) नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे. महिलांसाठी योजना आणून या सरकारने प्रायश्चित्त घेतले आहे. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थसंकल्पाच्या आडून महायुतीच्या आमदारांना खूश करण्यासाठी केलेला हा शेवटचा प्रयत्न  म्हणजे हा अतिरिक्त संकल्प आहे. अडिच वर्षे तिजोरी साफ करून झाल्यावर सरकारी तिजोरीवर महायुती सरकारने शेवटचा हाथ मारून तिजोरी साफ केली आहे. स्वत:चे खोके भरून झाल्यावर जनतेसाठी काहीतरी केल्याचा केविलवाणा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय.


महिलांसाठी योजना जाहीर करून महायुती सरकारने प्रायश्चित्त घेतलं आहे. महायुतीमधील एका नेत्याने बहिण-भावाच्या नात्यावर केलेले घाणेरडं वक्तव्य महायुतीला चांगलेच महागात पडलं आहे. राज्यात महिलावर अन्याय अत्याचार वाढले आहेत. गरीब महिलांना या सरकारने फाटक्या साड्या वाटल्या या  सगळयाचे प्रायश्चित्त म्हणून मुख्यमंत्री माझी 'लाडकी बहिण' योजना आणली आहे. गरीब माता भगिणींना फाटक्या साड्या वाटून पुन्हा त्यावर योजनांची ठिगळं लावून काही उपयोग होणार नाही. राज्यातील महिला या सरकारला चांगलाच धडा शिकविणार आहेत, असल्याचा हल्लाबोलही वडेट्टीवार यांनी केला आहे.


राज्यातील शेतकरी, महामंडळे, सारथी, बार्टी, महाज्योतीसारख्या संस्था यांच्यासाठी योजना जाहीर केल्या. पण हे लबाडाचं आमंत्रण आहे. ते जेवल्यावरच खरं मानावं लागेल. त्यामुळे या फसव्या तरतूदींना भूलन जाऊ नये. कारण अर्थसंकल्प सादर करायचा आणि त्याची अंमलबजावणी करताना जुमलेबाजी करायची हा या सरकारचा शिरस्ता आहे, असंही वडेट्टीवर यांनी म्हटलंय.


आर्थिक पाहणी अहवाल पाहिल्यावर मान शरमेनं खाली जाईल, अशी परिस्थिती दिसून आली आहे. महाराष्ट्राला गुजरातने मागे टाकल्याचा पुरावा म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल होता. दिल्लीश्वरांनी महायुतीला सत्ता मिळवून दिल्यावर त्यांनी महाराष्ट्राला गुजरातच्या मागे ठेवायचं काम महायुतीला दिल होतं. हे काम या सरकारने चोख बजावलं आहे. सुरतमधल्या पाहुणचारावेळी दिलेल्या कानमंत्रानुसार महाराष्ट्राला या महायुतीने खड्डयात घातले आहे. गुजरातच्या खाल्या मिठाला जागणारे हे सरकार महाराष्ट्राचं भलं करू शकत नाही. अशी जळजळीत प्रतिक्रीया वडेट्टीवार यांनी दिली आहे.