शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे की अनुभवी एकनाथ शिंदे?
आज शिवसेना भवनात होणाऱ्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शिवसेनेचा विधिमंडळ गटनेता निवडण्यात येणार आहे
मुंबई : शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांची निवड होण्याची शक्यता आहे. आज शिवसेना भवनात होणाऱ्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शिवसेनेचा विधिमंडळ गटनेता निवडण्यात येणार आहे. गटनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडं या पदासाठी अनुभवी एकनाथ शिंदे यांचंही नाव आघाडीवर आहे. शिवसेना आमदारांची बैठक संपल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत नव्या नेत्याच्या नावाची घोषणा करणार आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस झाल्यानंतर बहुमत मिळालेल्या भाजपा-शिवसेनेत सत्तास्थापनेबाबत कोणताही संवाद झालेला नाही. उलट दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे महायुतीत दरी कायम असल्याचं दिसलंय. भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीसांची एकमुखानं निवड झाल्यानंतर शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची ग्वाही भाजपानं दिली. तर असंच व्हायला हवं पण ते ठरल्याप्रमाणे व्हावं असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगत शिवसेनेची भूमिका कायम असल्याचं म्हटलंय. 'शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यातच दोघांचं हित आहे...' असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
तर, 'जे जे शक्य होईल, ते सर्व करणार...' असं सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. सरकार बनवण्यासाठी भाजपकडून अद्याप मातोश्रीवर कुठलाही संपर्क करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केल्याचं सांगण्यात येतंय.