परीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर - मुंबई विद्यापीठ
भीमा कोरेगाव येथे भीम अनुयायांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे जे विद्यार्थ्यी आज परीक्षेला पोहोचू शकले नाहीत. त्यांना नंतर परीक्षा देता येणार आहे. याबाबत निर्णय मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाचा निर्णय
‘जे विद्यार्थी ३ वाजता असलेल्या परीक्षेला पोहचू शकले नाहीत, पोहचणार नाहीत त्यांची परीक्षा नंतर घेण्यात येणार’, असल्याचं मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे. आज दुपारी ३ वाजता एकूण ९ परीक्षा आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परीक्षा विभागाची बैठक
महाराष्ट्र बंदचे मुंबईत अधिक पडसाद बघायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची बैठक बोलवण्यात आली होती. आंदोलनाचे रूप पाहता परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलात.
बंदमुळे विद्यार्थ्यांना अडचण
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. या बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आज मुंबई विद्यापीठाशी संबंधीत काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेण्यात येत आहे. सकाळी ११ आणि दुपारी ३ वाजता या परीक्षांच्या वेळा होत्या. आधी जे विद्यार्थ्यी उशिरा येतील त्यांना वेळ वाढवून देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता परीक्षेला पोहोचू न शकणा-या विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा देता येणार आहे.