बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक, शाळेतील CCTV फुटेजही गायब?
Badlapur Case : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने २४ तारखेला `महाराष्ट्र बंद`ची हाक दिली आहे. बदलापूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
Badlapur Case : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर आणि मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसशी (RSS) संबंधीत आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) गायब आहे, असा आरोप महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) केला आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली असून जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न
बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर होणारी चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. भाजपा युती सरकारला सत्तेची गुर्मी चढली आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण राज्यात प्रचंड वाढलं आहे, पण सरकार आपल्यात मस्तीत आहे. लाडकी बहिण म्हणून 1500 रुपये देण्यासाठी मोठ मोठे इव्हेंट केले जात आहेत पण बहिणींची सुरक्षा केली जात नाही. राज्य सरकार, गृहखाते, शासन आहे की नाही अशी परिस्थिती आहे. बदलापूरच्या घटनेत पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनसात पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही मविआने केला आहे.
दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी बदलापूरमध्ये लोकांनी मोठे जनआंदोलन केलं, पण ते आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न केला. राज्यात बाल अत्याचारांच्या घटनाही वाढल्या आहेत. भाजपा युती सरकार अत्यंत अकार्यक्षम, भ्रष्ट सरकार आहे या सरकारला जागे करण्यासाठी 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये मविआमधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. बदलापुरच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी डॉक्टर, वकील, पालक यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करावा असं आवाहनही मविआने केलं आहे.
राज्यात अत्याचाराच्या घटनेत वाढ
दीड दोन महिन्यात सातत्याने ठाण्यात महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना वाढत आहेत. मंदिरात बलात्कार झाला, हॉस्पिटलमध्ये विनयभंग झाला, आता शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात सात महिन्यात क्राईम 60 टक्के वाढला. सगळ्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो असं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनप्रकरणी 300 लोकांना अटक करण्यात आली त्याचा आम्ही निषेध करतो, आंदोलन महिलांच्या सुरक्षेसाठी होतं लोक पालक उतरले होते असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.