अमित भिडे / मुंबई : महाराष्ट्र बंदमुळे मुंबईत रेल्वे, रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अनेकांनी चालत घराचा रस्ता धरला होता. ट्रॅकवरून चालत जाणारी माणसं, वृद्ध, स्त्रिया असं चित्रं मुंबईत होतं. मात्र अशाही परिस्थितीत सगळं बंद असताना माणुसकीचं वेगळंच चित्रं मुंबईत पाहायला मिळालं. 


 रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राज्यात भीमा कोरेगावचे पडसाद उमटत होते. त्यात आज महाराष्ट्र बंद. त्यामुळे विविध ठिकाणी सुरू असलेल्या जन आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. रेल्वे रूळांवरून मुंबईकरांनी आपल्या गंतव्य स्थानी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. 


मुंबईकर ट्रॅकवरून घरी


गाडी उभी असलेल्या ठिकाणापासून दूर दूरच्या ठिकाणी मुंबईकर ट्रॅकवरून चालत निघाले होते. दुपारच्या उन्हात ऊन तापायला लागलं होतं. त्यातच मुंबईच्या खऱ्या स्पिरीटचं दर्शऩ घडलं. विक्रोळी घाटकोपर स्टेशनांआधी शेजारच्या वसाहतींमधल्या स्थानिकांनी रेल्वे रूळांवर येऊन पाणी वाटपाला सुरूवात केली. पाण्यासोबतच अनेक ठिकाणी बिस्कीटंही दिली जात होती.



मुंबई  स्पिरीट पुन्हा एकदा 


रेल्वे रूळांवरून चालत जाणाऱ्यांना पाणी वाटप केलं जात असतानाच गाड्यांमध्ये अडकलेल्यांनाही पाणी दिलं जात होतं. एकीकडे जातीच्या आधारावर महाराष्ट्र पेटला असताना मुंबईत मात्र जातीपातीचा धर्माचा अडसर न बाळगता एकमेकांना मदत केली जात होती. मुंबईच्या ज्या स्पिरीटचं नेहमी कौतुक केलं जातं ते स्पिरीट पुन्हा एकदा दिसून आलं.