आताची मोठी बातमी! डॉक्टरांचा संप अखेर मागे, भाजपच्या संकटमोचकांने काढला तोडगा
गेले दोन दिवस राज्यातील मार्डचे डॉक्टर संपावर गेले होते, त्यानंतर आज संप मागे घेत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
Mard Strike : मार्डच्या (MARD) संपावर तोडगा काढण्यात अखेर यश आलं आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याबरोबर बैठक पार पडली या बैठकीनंतर मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. संपावर (Strike) तोडगा काढण्यासाठी गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत मार्डच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वीच मार्डची वैद्यकीय शिक्षण संचालकांसोबत बैठक झाली होती. मात्र त्या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळे आता मंत्र्यांसोबत चर्चा झाली.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील जवळपास सात हजार डॉक्टर संपावर गेले होते. आपल्या मागण्यांसाठी आज मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने गिरीश महाजन यांची भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
काय म्हणाले गिरीश महाजन
मार्डच्या डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था हा सर्वात मोठा मुद्द आहे. सध्या दहा हजार खोल्या आहेत, पण त्या कमी आहेत. ज्या आहेत त्यांची ही तातडीने डागडुजी करण्याची गरज आहे, अनेक ठिकाणी बाथरून गळतायत, अनेक ठिकाणी रुम दुरुस्त करणं आवश्यक आहे. काही ठिकाणी स्लॅब कोसळले आहेत. यासंदर्बात संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना तातडीने डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी बारा कोटी रुपये दिले आहेत.
पण केवळ डागडुजी नाही तर कायम स्वरुपी हा प्रश्न मिटला पाहिजे, यासाठी केंद्र सरकारकडे 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांना हॉस्टेल बांधण्यास मदत करण्याची विनंती केलेली आहे, काही सकारात्मक उत्तरं आलेली आहेत, लवकरच यासंदर्भातली प्रक्रिया सुरु होईल. कोणत्याही स्वरुपात या विद्यार्थ्यांना चांगली व्यवस्था करुन द्यायची आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
याशिवाय रिक्त पदं आहेत ती येत्या दोन दिवसात भरली जातील, बीएमसीशी संबंधित काही विषय त्यावरही बोलणी झाल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.