Maharashtra Politics : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच होणार, अजित पवारांकडे `या` खात्याची शक्यता
अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी गेल्या रविवारी म्हणजे 2 जुलेला शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला आता एक आठवडा उलटला, पण अद्यापही खातेवापट झालेलं नाही. त्यामुळे खातेावाटपावरुन तीन पक्षात वाद सुरु आहे का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.
Maharashtra Political Crisis : अजित पवार (Ajit Pawar) बंड केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadanvis Government) सहभागी झाले. अजित पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण आता शपथविधी सोहळ्याला आठवडा उलटून गेला असला तरी खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये (Shinde-Fadanvis-Pawar Government) खातेवाटपावरुन वाद सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. यादरम्यानच, राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांकडे अर्थ खातं (Finance Department) जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सध्या अर्थ खातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे आहे. त्यांचं खातं आता अजित पवारांकडे जाईल.
कोणाला कोणतं खातं?
मात्र गृह (Home Department) आणि सहकार खातं मात्र भाजप (BJP) स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राज्य सरकारच्या खातेवाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याची माहिती मिळतेय.. मात्र निधीवाटपावरुन शिंदे गटाने तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांविरोधात नाराजी बोलून दाखवली होती. तेव्हा शिंदे गटाला हा निर्णय मान्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान राज्यात सध्या राष्ट्रवादीचे नव्याने आलेले मंत्री हे बिनखात्याचे आणि बिनकामाचे आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली. सरकारमध्ये कमालीचा असंतोष असल्याचा दावा त्यांनी केला. याला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. खातेवाटपाबाबत काळजीचं कारण नाही, मविआचं महिन्यानंतर खातेवाटप झालं होतं, आता लवकरच खातेवाटप होईल असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
रोहित पवार यांचा आरोप
अजित पवारांसोबतच्या चार ते पाच बंडखोर नेत्यांनी त्यांना व्हिलन केलं असा मोठा आरोप रोहित पवारांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई भाजपविरोधात असल्याचंही रोहित पवारांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे, रोहित पवार हा सुळे गटाचा पप्पू आहे अशी टीका भाजप नेते आणि आमदार नितेश राणेंनी केलीय. संजय राऊतांनी ठाकरे गट संपवला तसाच रोहित पवार सुळे गट संपवेल असा टोला त्यांनी मारला.
चिन्हाबाबत लवकरच सुनावणी
दरम्यान, शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे .धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी याचिका दाखल केली होती. त्यावर आता सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात ही केस प्रलंबित असल्याने 12 आमदारांची अजूनही नियुक्ती झालेली नाहीये. ठाकरे सरकारने 12 जणांच्या नावाची यादी दिली होती. ती तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थंड बस्त्यात ठेवली. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी नवीन यादी पाठविली .मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या पत्राचा आधार घेऊन 5 सप्टेंबर 2022 नंतर नवीन आमदार नियुक्त करणेबाबत हालचाल सुरू केल्या. मात्र, उद्धव ठाकरे सरकारने दिलेली मूळ यादी दिली तीच कायम ठेवावी .राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करायला हवं...अशी याचिका दाखल करण्यात आली. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.