Maharashtra Cabinet Portifolios Allotment Today: शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील (Shinde-Fadanvis-Pawar Government) खातेवाटपला अखेर मुहूर्त मिळालाय. शपथविधी घेऊन 11 दिवस उलटल्यानंतर अखेर आज राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांचं खातेवाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (BJP) काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. खातेवाटपाची चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांशी  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बैठक घेणार आहेत. काल रात्री अजित पवार, प्रफुल पटेल यांची गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाल्यानंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय. त्यामुळे आता कुणाला कोणते खातं मिळणार याचीच उत्सुकता लागलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी काल रात्री दिल्लीत अमित शाहांची भेट घेत प्रदीर्घ चर्चा केली. य बैठकीत राष्ट्रवादीला हवी असलेली खाती आणि राष्ट्रवादीला देता येतील अशी खाती यावर चर्चा झाली असं सांगितलं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य न्यायालयीन लढ्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच विधानपरिषदेतल्या 12 जागांमध्येही राष्ट्रवादी अजित पवार गटाने वाटा मागितला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. जित पवारांच्या दिल्ली दौ-यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा आज सुटणार असल्याची चर्चा आहे. 


मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर
राज्य मंत्रिमंडळ कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आज मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार नाही. केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत राज्यातील विस्तार होण्याची शक्यता नाही अशी सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. तीनही पक्षातले अनेक इच्छुक सध्या मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून आहेत. विस्तारासंदर्भात बैठका, चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे विस्तार कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता होती. मात्र आज विस्तार होणार नाही हे जवळपास निश्चित झालंय. 


मंत्रिमंडळ विस्तार आज होणार नसल्याची महत्वाची कारणे
- केंद्रातील विस्तार होई पर्यंत राज्यातील विस्तार होण्याची शक्यता कमी
- भाजपचे सगळे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा आज दिवसभर भिवंडीत मेळावा
- राष्ट्रवादीचे प्रमुख मंत्री मंत्रीपद मिळाल्यावर आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत
- मुख्यमंत्री स्वतः आजपासून राज्याच्या दौऱ्यावर निघतायत. त्याआधी ठाण्यात मोठ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. इथे शिंदे गटाचे बहुतांश आमदार उपस्थित असतील. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार नाही


बच्चू कडूंची तलवार म्यान
दुसरीकडे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी आज आपली तलवार  तात्पुरती म्यान केलीय. 17 जुलैला मुख्यमंत्री शिंदेंशी बोलून 18 जुलैला आपला निर्णय जाहीर करू असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. पदाची आपल्याला हाव नाही, नाराजी वगैरे अजिबात नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय.