रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा, राज्यभरात मोठ्या दिमाखात होणार साजरा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात हा सोहळा सारा केला जाणार आहे.
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त राज्य सरकारतर्फे (Maharashtra Government) उद्या म्हणजे 2 जून रोजी ऐतिहासिक किल्ले रायगडावर (Raigad) शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त (Shiv Bhakta) येणार असून त्यांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. 1 जूनपासून; रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. 1 जूनला गेट वे ऑफ इंडिया इथं शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. हे प्रदर्शन 6 जूनपर्यंत सुरु राहणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाची रुपरेषा
सकाळी 7 वाजता - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन
सकाळी 7.30 वाजता - पालखी प्रस्थान, राज सदर ते जगदेश्वर मंदिर
सकाळी 8 वाजता - भव्य ध्वजारोहण (नगरखान्यातील भव्य ध्वज)
सकाळी 9 वाजता - शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सोहळ्याला प्रारंभ होणार
सकाळी 11 वाजता - शाही शोभायात्रा प्रारंभ होईल
सायंकाळी 5 वाजेपर्यंत - शिवप्रतिमा दर्शन सोहळा
आरोग्य यंत्रणा सज्ज
किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येत शिवप्रेमी रायगडावर येत आहेत. उन्हाची तीव्रता, रायगड किल्ल्यावरील बदलते वातावरण आणि चढ उतारामुळे होणारे अधिकचे श्रम यामुळे शिवप्रेमींना कोणत्याही आरोग्य विषयक समस्येला सामोरे जावे लागु नये यासाठी किल्ल्यावर तसंच पायथ्याशी पाचाड इथं आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर आरोग्य पथकं तैनात ठेवण्यात आली असून तिथं आरोग्य तपासणी बरोबरच औषधे, पाणी, ओआरएसचे वाटप करण्यात येईल. रायगडावर 10 बेड तर पाचाड इथं 15 बेड आयसीयु व्यवस्था करण्यात आली आहे . याशिवाय जनरल ओपीडी, आरोग्य टिम, रुग्णवाहीका, खाजगी दवाखान्यांमध्ये राखीव बेड अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत
पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रायगड पोलिसांनीही कंबर कसली आहे. सुमारे 200 पोलीस अधिकारी, 1800 कर्मचारी, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. पाचाड आणि किल्ल्यावर होळीचा माळ इथं नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. ते सर्व यंत्रणांनी सुसज्ज आहेत. कोणतीही परिस्थिती उद्भवली तर तिथून आवश्यक ते निर्देश दिले जातील. 109 सीसीटिव्ही कॅमेरे
लावण्यात आले असून गर्दी नियंत्रणावर विशेष भर दिला जाणार आहे
राज्याच्या उपराजधानीतही सोहळा
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घोष पथकाचे वादन होणार आहे. त्याचबरोबर श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे 30 ढोलताशा पथकांची एकत्रित मानवंदना देण्यात येणार आहे. महालस्थित शिवतीर्थावर शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांसोबतच नागपुरातील 30 ढोलताशा पथकांची एकत्रित मानवंदना आकर्षणाचे केंद्र राहाणार आहे. त्याचबरोबर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि हंबीरराव मोहिते यांचे वंशज सकाळच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.